
>> हेमंत महाजन [email protected]
रशियाचे युरोपमधील कथित ड्रोन युद्ध हे केवळ भू-राजकीय तणाव वाढविणारे कृत्य नाही, तर त्याने आधुनिक युद्धाचे स्वरूपच बदलले आहे. ड्रोन आता केवळ टार्गेट शोधण्याचे साधन न राहता थेट हल्ला करण्याचे आणि मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचे एक प्रभावी शस्त्र बनले आहे. युरोपने या धोक्याचा सामना करण्यासाठी सामूहिक संरक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे युरोपच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडेल. भारतासाठी हा संघर्ष एक महत्त्वपूर्ण धडा आहे.
रशिया-युक्रेन संघर्षाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ड्रोन वॉरफेअर (Drone Warfare), ज्याला ‘मानवरहित हवाई वाहन’ (UAVs) युद्ध असेही म्हणतात. सुरुवातीला युक्रेनच्या भूमीवर मर्यादित असलेले हे ड्रोन युद्ध आता युरोपातील अनेक देशांच्या हवाई सीमेत घुसखोरी करत असल्यामुळे या संघर्षाची व्याप्ती वाढली आहे. युरोपच्या संरक्षणाबाबत अमेरिका तयार नाही. रशियाने ड्रोनचा वापर करून युरोपवर मनोवैज्ञानिक आणि लष्करी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. या घुसखोरीमुळे युरोपातील अस्थिरता आणि असुरक्षितता वाढली आहे.
रशियाच्या या वाढत्या ड्रोन युद्धामागे केवळ तत्काळ लष्करी फायदे नसून दीर्घकालीन भू-राजकीय आणि मनोवैज्ञानिक उद्देश आहेत.रशियाने ड्रोन्सचा वापर करून पोलंड, रोमानिया, डेन्मार्क, नॉर्वे या देशांमध्ये हवाई सीमेत घुसखोरी केली आहे. त्यामुळे युरोपीयन देशांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. ही घुसखोरी प्रामुख्याने दोन हेतूंनी आहे . युरोपियन देशांना घाबरविणे आणि रशियाचे वर्चस्व सिद्ध करणे, युरोपियन युनियन आणि NATO मध्ये फूट पाडून तिथल्या एकात्मतेला नुकसान पोहोचविणे. रशिया कमी खर्चाचे ड्रोन वापरून महागडय़ा युरोपियन एअर-डिफेन्सला डिवचत आहे. दडपशाही निर्माण करणे आणि पश्चिमेकडील शक्तींना मानसिकदृष्टय़ा आणि आर्थिकदृष्टय़ा कमजोर करणे हेदेखील एक उद्दिष्ट आहे
रशिया युरोपातील देशांच्या हवाई संरक्षण प्रणालीतील (Air Defense Systems) ‘गॅप्स’ (Gaps) आणि कमकुवत दुवे शोधत आहे. ड्रोनच्या सततच्या घुसखोरीमुळे युरोपियन देशांना त्यांच्या रडार यंत्रणा आणि प्रतिक्रिया वेळ (Response Time) तपासण्याची संधी मिळते. लहान आणि कमी वेगाचे ड्रोन (उदा. शाहेद प्रकारचे) हवाई संरक्षणाच्या प्रणालींना चकमा देऊ शकतात का? याची तपासणी करून भविष्यातील मोठे हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे हा रशियाचा उद्देश आहे.
नाटो (NATO) सदस्य राष्ट्रांना त्यांच्या सीमांच्या सुरक्षिततेची चिंता सतावल्यास युक्रेनला दिली जाणारी मदत कमी होईल, असा रशियाचा होरा आहे. ड्रोन घुसखोरीमुळे युरोपातील नागरिकांमध्ये सततची भीती आणि अस्थिरता निर्माण होते, ज्यामुळे युद्धग्रस्त भागापासून दूर असलेल्या राष्ट्रांवरही अप्रत्यक्ष दबाव येतो. रशिया अजूनही युरोपमध्ये आपले वर्चस्व (Hegemony) टिकवून ठेवण्याची क्षमता ठेवतो हे दर्शविण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. अमेरिकेच्या कमकुवत आंतरराष्ट्रीय भूमिकेचा फायदा घेऊन रशिया युरोपला आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे.
रशियाकडून वाढत्या ड्रोन धोक्याला युरोपियन देश आणि नाटो हे सामूहिक आणि तांत्रिक पातळीवर प्रतिसाद देत आहेत. रोमानियासारख्या सीमावर्ती देशांमध्ये नाटोने हवाई पाळत आणि गस्त वाढवली आहे. ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक रडार प्रणाली बसविण्यात आल्या आहेत. रशियाच्या धोक्यामुळे नाटो सदस्यांनी सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक घेऊन ‘आर्टिकल 4’चा (Article 4 – सल्लामसलत) वापर केला आहे.
युरोपियन स्काय शील्ड इनिशिएटिव्ह (European Sky Shield Initiative – ESSI) : जर्मनीच्या नेतृत्वाखालील या उपक्रमात युरोपियन देश एकत्रितपणे क्षेपणास्त्रs आणि ड्रोनपासून संरक्षण करण्यासाठी ‘आयर्न डोम’ (Iron Dome) आणि ‘पॅट्रियट’सारख्या (Patriot) प्रणाली खरेदी करत आहेत, जेणेकरून त्यांची हवाई संरक्षण क्षमता वाढेल.
रशियाच्या ड्रोनचे सिग्नल जॅम (Jam) करण्यासाठी आणि त्यांचे नियंत्रण खंडित करण्यासाठी युरोपातील देश इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
भारतासाठी धडे
भारताच्या बाबतीत पाकिस्तान गेल्या काही वर्षांत पंजाब सीमेतून मोठय़ा प्रमाणात ड्रोनद्वारे अफू, गांजा, चरस व शस्त्रs घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. 2024 मध्येच पंजाब पोलिसांनी आणि BSF ने मिळून पाचशेहून अधिक ड्रोन भारतीय सीमेवर जप्त केले. हे आकडे या धोक्याची तीव्रता अधोरेखित करतात. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल आसीम मुनीर यांनी जामनगर (गुजरात) येथील जगातील सर्वात मोठय़ा रिफायनरी प्रकल्पावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करण्याची धमकी दिली.
ड्रोन युद्ध हे आता भविष्य नव्हे, वर्तमान आहे. भारतीय सैन्याने आधुनिक, स्वदेशी आणि AIआधारित ड्रोन ट्रायल व तैनाती वाढवायला हवी. टेहळणी, ISR (Intelligence, Surveillance, Reconnaissance) आणि सामरिक मारक क्षमता वाढविण्यासाठी जाम-प्रतिरोधक ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या दिशेने संशोधन हवे. भारतीय सीमांवर ड्रोन-आधारित निगराणी, तत्काळ प्रतिसाद आणि सामरिक वापराचा विस्तार करणे गरजेचे आहे. भारत ड्रोनच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनायला हवाय. SWITCH, TAPAS-BH अशा स्वदेशी प्रकल्पांची गती आणि बाजारपेठ निर्मिती सशक्त करणे महत्त्वाचे आहे.
रशियाचे युरोपमधील कथित ड्रोन युद्ध हे केवळ भू-राजकीय तणाव वाढविणारे कृत्य नाही, तर त्याने आधुनिक युद्धाचे स्वरूपच बदलले आहे. ड्रोन आता केवळ टार्गेट शोधण्याचे साधन न राहता थेट हल्ला करण्याचे आणि मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचे एक प्रभावी शस्त्र बनले आहे. युरोपने या धोक्याचा सामना करण्यासाठी सामूहिक संरक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे, आर्थिकदृष्टय़ा हे अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे युरोपच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडेल. भारतासाठी हा संघर्ष एक महत्त्वपूर्ण धडा आहे. भविष्यातील युद्धे ही ‘टेक्नॉलॉजी ड्रिव्हन’ (Technology-Driven) असतील. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी तांत्रिक आत्मनिर्भरता आणि अत्याधुनिक हवाई संरक्षण क्षमता विकसित करणे हे अनिवार्य आहे.