
>> प्रसाद ताम्हनकर,[email protected]
काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांची भेट झाली. या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले. त्यापैकी एक म्हणजे चिनी अॅप्सवर लादलेली बंदी काही प्रमाणात दूर होणार. हिंदुस्थान सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही चिनी अॅप्सवर बंदी घातलेली आहे. या अॅप्सपैकी एक लोकप्रिय असे अॅप म्हणजे टिकटॉक. हे टिकटॉक पुन्हा लवकरच हिंदुस्थानी जनतेसाठी उपलब्ध होईल अशी चर्चा जोरात आहे. एकीकडे टिकटॉक हिंदुस्थानात पुन्हा येणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत प्रेम असलेल्या या अॅपला घरघर लागणार का? असा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
हिंदुस्थानप्रमाणेच अमेरिकेच्या संसदेनेदेखील एक कायदा मंजूर करत टिकटॉक या चिनी अॅपवर बंदी घातलेली होती. एप्रिल 2024 मध्ये टिकटॉकची मालक असलेल्या बाईटडान्स या कंपनीला तिचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीला विकण्याची मागणी अमेरिकेतर्फे करण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा आणि अमेरिकन जनतेच्या गोपनीय माहितीची सुरक्षा लक्षात घेऊन हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. बाईटडान्स कंपनीने या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले आणि त्याचा परिणाम म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी कारभार स्वीकारण्याच्या बरोबर एक दिवस आधी या अॅपवर बंदी घालण्यात आली.
अमेरिकेत साधारण 17 कोटी लोक टिकटॉकचा वापर करतात. या सर्वांना अचानक हे अॅप वापरासाठी अनुपलब्ध झाले. मात्र ट्रम्प यांनी करभार स्वीकारल्याबरोबर लगेच एक कार्यकारी आदेश जारी करून ही बंदी 75 दिवस पुढे ढकलली. जानेवारीमध्ये टिकटॉकवर घालण्यात आलेल्या बंदीची मुदत आजपर्यंत चारवेळा वाढवण्यात आली. आता ही मुदत डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. ट्विटरने बंदी घातल्यानंतर स्वतचे ट्रुथ नावाचे नवे अॅप तयार करणाऱया डोनाल्ड ट्रम्प यांना चिनी कंपनीच्या टिकटॉकविषयी एवढे ममत्व का वाटते आहे हा अनेकांच्या काळजीचा विषय बनलेला आहे.
इतर सोशल अॅप्सप्रमाणे टिकटॉकदेखील ग्राहकांची गोपनीय माहिती गोळा करत असते. टिकटॉकची मालकी चिनी कंपनीकडे असल्याने संसदेच्या दृष्टीने तो गंभीर चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात व्हाईट हाऊसतर्फे नुकतीच महत्त्वाची बातमी देण्यात आली. टिकटॉक अॅपच्या अल्गोरिदमवर यापुढे अमेरिकन कंपन्या नियंत्रण ठेवतील आणि टिकटॉकच्या अमेरिकन कारभारात त्याच्या बोर्डावरील सात जागांपैकी सहा जागा या अमेरिकन लोकांकडे असतील. यासंदर्भात लवकरच करार होऊ शकतो असेदेखील सांगण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील यासंदर्भात पोस्ट करून आपली आणि शी जिनपिंग यांची यासंदर्भात फोनवर चर्चा झाली असून जिनपिंग यांनीदेखील या कराराला मान्यता दिली असल्याचे सांगितले.
ट्रम्प यांनी यासंदर्भात जाहीर माहिती दिली असली तरी चीनने मात्र यासंदर्भात काहीही टिपणी केलेली नाही. उलट चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून त्यातदेखील या करारासंदर्भात स्पष्ट असा काही उल्लेख केलेला नाही. चीनमधील कायदे आणि नियमांनुसार तोडगा काढण्याची आणि व्यापाराचे जे काही नियम आहेत, त्यानुसार चर्चा करण्याची बाईटडान्स कंपनीची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा चिनी सरकार सन्मान करते असे निवेदनात स्पष्ट केले आहे. अमेरिकन व्यक्तीला किंवा कंपनीला आपला अमेरिकेतील व्यवसाय विकण्यास बाईटडान्स कंपनी फारशी उत्सुक दिसत नाही. आता टिकटॉकप्रेमी डोनाल्ड ट्रम्प यांची पावले कोणत्या दिशेनं पडतात यावर टिकाटॉकचे अमेरिकेतील अस्तित्व अवलंबून आहे. ट्रम्प यांचा बेभरवशाचा कारभार बघता त्यांचे प्रेम कधी रागात बदलेल याचा काही नेम नाही हेदेखील तेवढेच खरे.