
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह लोकशाही आणि रोजगाराच्या मुद्दय़ावर उपोषण करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पतीला बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. तसेच अटकेनंतर मला पतीशी बोलणेही करू दिलेले नाही, असा दावा करीत गीतांजली यांनी मोदी सरकारच्या दडपशाहीला आव्हान दिले आहे. त्यांनी हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली असून त्यावर 6 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पूर्ण राज्याचा दर्जा आणि राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. याचदरम्यान लडाखमध्ये हिंसक निदर्शने भडकावल्याच्या आरोपाखाली त्यांना 26 सप्टेंबरला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) अटक करण्यात आली. ही कारवाई म्हणजे मोदी सरकारची दडपशाही असल्याता गंभीर आरोप करीत वांगचुक यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
लडाख प्रशासनाकडून आरोपांचे खंडन
सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. सरकार राजकीय सूडबुद्धीने वागत आहे. पूर्णपणे दडपशाही सुरू आहे, असा आरोप विविध संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यावर लडाख प्रशासनाने राजकीय सूडबुद्धीच्या आरोपाचे खंडन केले आहे.