
ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांचे आणि जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये असलेल्या १०८ गणांच्या आरक्षणाची सोडत येत्या १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे डोळे आता या सोडतीकडे लागले आहेत. आपल्या गटात तसेच गणात कोणते आरक्षण पडेल या विचाराने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्हा परिषदेचे सर्वाधिक गट भिवंडी तालुक्यात २१ तर सर्वात कमी गट अंबरनाथ तालुक्यात ४ इतके आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना निश्चित केल्यानंतर आता आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ अशा पाच पंचायत समिती आहेत. या सर्वच पंचायत समितीमध्ये १०८ इतके गण आहेत. या गट आणि गणांच्या आरक्षणासाठी येत्या १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने गट आणि गणांच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. आपला हक्काचा गट किंवा गण आपल्याकडे कायम राहतो की दुसऱ्या कोणाच्या वाट्याला जातो, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे.
आरक्षण सोडतीमध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षित असलेल्या गट आणि गणांतील उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे तयार करण्याकरिता सुमारे एक ते दीड महिन्याचा कालावधी दिला जातो. त्यामुळे ही निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीत होणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.