
डॉ. मीनाक्षी पाटील
संतांनी ज्या सगुण–निर्गुणाचा वेध आपल्या साहित्यातून घेतला तसा अखंड शोध चित्र, नृत्य, नाटय़, संगीत अशा कलांमधून सातत्याने घेतला जातोय. कला, विज्ञान, विविध ज्ञानशाखा व एकूणच जगण्यातील व्यक्त–अव्यक्ताचा धांडोळा घेणारे, दृश्य–अदृश्याचा वेध घेणारे हे सदर.
आपल्या आकलनाच्या पलीकडे जे अज्ञात आहे ते अनादि काळापासून माणसाला सतत खुणावत आले आहे. हजारो वर्षे वेगवेगळ्या माध्यमांतून त्या अज्ञाताला जाणून घ्यायचा निरंतर प्रयत्न माणूस करीत आहे. मानवी संस्कृतीचा सारा प्रवास पाहिला तर असं लक्षात येतं की माणसाचा हा शोध जसा अदृश्याविषयी आहे तसाच तो दृश्याविषयीदेखील आहे. अगदी जन्मल्यापासून आपल्याला दिसणाऱया दृश्याकारांना अर्थ देण्याचा आपला सतत प्रयत्न सुरू असतो. आपण सारे आपापल्या पंचेंद्रियांच्या अनुभवांच्या आधारे जे जग समजून घेतो तेच खरं असतं का? की सत्य अजून काही वेगळंच असतं? मुळात आपल्याला जे दृश्य दिसतं तेवढंच सत्य असतं की त्या पलीकडेही अदृश्य असं काही असतं? यासारख्या अनंत प्रश्नांविषयी, दृष्टीआडच्या सृष्टीविषयी आज वेगवेगळ्या ज्ञानशाखांतून नवनवं संशोधन पुढे येत आहे. आपल्याला अवकाशात तसेच आपल्या भवतालात जे दिसते त्यापलीकडेही खरे तर खूप काही असते. खूप दूरच्या आकाशगंगा, ग्रह, तारे आपल्याला जसे दिसत नाहीत तसेच आपल्या अगदी जवळ असूनही सूक्ष्म जीवही आपल्याला दिसत नाहीत. याचा अर्थ ते अस्तित्वातच नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. या अदृश्य गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण दुर्बिणीचा, सूक्ष्मदर्शक यंत्रांचा, एक्सरे, रेडिओ लहरी, अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड अशा वेगवेगळ्या किरणांचा वापर करून घेत आहोत . रेण्वीय जैवविज्ञानाच्या जन्माबरोबरच मानवी अस्तित्वाविषयी अज्ञात असलेल्या अनेक गोष्टींची, गुणसूत्रात दडलेल्या सांकेतिक भाषेची उकल अनुवंशशास्त्रज्ञांना होऊ लागली आहे.
थोडक्यात व्यावहारिक जगात माणसांच्या साध्या डोळ्यांनी (मॅक्रोस्कोपिक) अनेक सूक्ष्म गोष्टी दिसू शकत नाहीत, परंतु आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे सूक्ष्मातिसूक्ष्म जगताचा वेध घेणं शक्य होऊ लागलं आहे. हल्ली नॅनो तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण एकेकटा अणू हाताळू शकतो. स्कॅनिंग-टनेलिंग मायक्रोस्कोप वापरून आपण आपल्या मनाप्रमाणे अणूंना हाताळू शकतो. हे सारं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक जगांना वेगळी करणारी अशी अदृश्य भिंत नाहीय, तर त्यांच्यात एक अखंडत्व (काँटिनम) आहे. कोणत्याही घन वस्तूतले अणु-रेणू हे एकमेकांना अगदी घट्ट चिकटून असतात असं आपल्याला दिसतं, पण खरं तर त्याच्या आत खूप मोकळी जागा असते. ज्या बऱयाच गोष्टींना आपण ‘घन’ समजतो, त्या आपण ‘समजतो तितक्या ‘घन’ नसतात. काही प्रकारच्या घन वस्तूतून (काच) फोटॉनसारखे सूक्ष्म कण आरपार जाऊ शकतात, इलेक्ट्रॉनपेक्षा लहान कण न्यूट्रिनो आपल्या डोक्यातून दर सेकंदाला प्रवास करीत असतात. खरे तर अणूरेणूंचा सूक्ष्म पातळीवर विचार केला तर त्यात ‘भरीव’ आणि ‘रिकामी जागा’ यांना तसा काही अर्थ नाही. खगोलशास्त्रात ‘पोकळ अवकाशाची’ संकल्पना निरर्थक ठरली आहे तर ‘भरीव भौतिक वस्तूंची’ संकल्पना अतिसूक्ष्म जीवशास्त्राने, अणुशास्त्राने सपशेल निकालात काढली आहे.
आइन्स्टाईच्या व्यापक सापेक्षता सिद्धांतात ‘भरीव’ आणि ‘पोकळी’ या दोन संकल्पनांना वेगळे मानता येत नाही. त्याच्यामते प्रचंड खगोलांमध्ये गुरुत्वाकर्षण क्षेत्र असतेच आणि अवतीभोवतीच्या अवकाशाच्या वक्रतेच्या रूपात त्याचे प्रकटीकरण होते. परंतु याचा अर्थ असा नव्हे की क्षेत्र त्या अवकाशाला वक्रता आणते तर मूलत क्षेत्र व अवकाशाची वक्रता भिन्न नसून, हे क्षेत्र म्हणजेच अवकाशाची वक्रता असते. अशा रीतीने आइन्स्टाइनच्या सिद्धांतानुसार भौतिक पदार्थ त्याच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रापासून वेगळे करता येत नाहीत आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्र आकाशाच्या वक्रतेपासून वेगळे करता येत नाही.
या विचारात पुढे आकाराला आलेल्या क्वांटम सिद्धान्ताने अधिकची भर घातली आहे. क्वांटम सिद्धान्तातील संभाव्यतेच्या सूत्रानुसार भौतिक जड वस्तू एकाच वेळी कण आणि तरंगस्वरूपातही असू शकतात. काही प्रसंगी त्या कणस्वरूपात भासतात तर काही प्रसंगी त्या तरंगाप्रमाणे वाटतात. उदा. क्वांटा किंवा फोटॉनस्वरूपातील प्रकाश उत्सर्जन/शोषण किंवा विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपातील प्रकाशाचा अवकाशातील प्रवास. या अर्थाने भौतिक पदार्थ आणि अवकाश (भरीव व पोकळी), साकार-निराकार, दृश्य-अदृश्य हे एकाच पूर्णाचे अविभक्त आणि परस्परावलंबी भाग म्हणता येतात आणि मग ‘भरीव’ व ‘पोकळी’ या पारंपरिक संकल्पनांना तसा काही अर्थ उरत नाही.
असे असले तरी आदिम काळापासून समग्र मानवी अस्तित्व या ‘भरीव’ आणि ‘पोकळी’ या दोन संकल्पनांभोवती, त्यातून निर्माण झालेल्या द्वंद्वाभोवती अखंड खेळत आहे. किंबहुना अस्तित्वव्यापी अशा या द्वंद्वभावानेच मानवी जगण्याच्या खेळात जशी मजा आलीय तशीच गुंतागुंतही वाढलीय. ग्लास अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे? ईश्वर आहे किंवा नाही आणि मुळात असलाच तर तो साकार आहे की निराकार? चित्र, नृत्य, नाटय़, संगीत अशा विविध कलांमधल्या भरीवता आणि पोकळी यांच्यात काही नातं असतं की नाही? तर या नात्याचाच शोध आपण पुढील लेखांमधून घेणार आहोत.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)