
>> मेधा पालकर
कोथरुडमधून थेट आकाशदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल. अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल येथे शहरातील पहिले डिजिटल तारांगण उभारण्यात आले आहे. सर्वसामान्य पुणेकरांनाही सुट्टीच्या दिवशी ‘आकाशातली सफर’ करता येणार आहे.
डॉ. नानासाहेब उपासनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकारलेले हे तारांगण आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेले असून, डिजिस्टार 2025 या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करणारे हे भारतातले पहिलेच प्लॅनेटेरियम ठरले आहे. 50 आसनी वातानुकूलित हॉलमध्ये ‘फुल डोम प्रोजेक्शन’सह सूर्य, ग्रह, गॅलेक्झी आणि खगोलविश्वाचा थरारक अनुभव इथे मिळतो. डॉ. उपासनी यांच्या स्मृतीला साजेशी ही विज्ञानाची भेट त्यांचे चिरंजीव सुधीर उपासनी यांच्या आर्थिक सहकार्याने प्रत्यक्षात आली आहे. या तारांगणातून केवळ खगोलशास्त्र नव्हे, तर जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पृथ्वीविज्ञान अशा विविध विज्ञान शाखांच्या संकल्पना थेट डोमवर, रंजक पद्धतीने समजावून सांगितल्या जातात. या शोमुळे विज्ञान विषय शिकणे ‘पुस्तकी’ न राहता ‘दृश्य’ अनुभवातून शिकण्याचा मार्ग खुला झाला आहे. या सुविधेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम सादर केले जातील, ज्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाशी सुसंगत संवादात्मक सत्रांचा समावेश असेल.
डिजिस्टार 2025 प्लॅनेटेरियम पुणे हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध डिजिस्टार 2025 प्रणालीने सुसज्ज आहे, जी डिजिटल प्लॅनेटेरियम तंत्रज्ञानातील आघाडीच्या इव्हान्स अँड सदरलँडने विकसित केली आहे. या प्रगत प्रणालीमध्ये 10-मीटर टिल्टेड डोम, सहा हाय रिझोल्यूशन प्रोजेक्टर आणि 10.2 सराऊंड साऊंड सिस्टम आहे, जे पूर्णपणे विसर्जित करणारे वातावरण तयार करते जे अभ्यागतांना विश्वाच्या खोलवर घेऊन जाते. पारंपरिक प्लॅनेटेरियमच्या विपरीत, डिजिस्टार 2025 तारा क्षेत्रांपासून दूरच्या आकाशगंगांपर्यंत खगोलीय घटनांचे गतिमान, रिअल-टाइम व्हिज्युअलायझेशन देते, ज्यामुळे ते शिक्षण आणि मनोरंजन दोन्हीसाठी एक शक्तिशाली साधन बनते, असे नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले.