अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्याची हत्या, पेट्रोल पंपावर अज्ञाताने झाडल्या गोळ्या

अमेरिकेतील डलासमध्ये एका २७ वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. चंद्रशेखर पोल, असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो हैदराबाद येथील रहिवासी होता. चंद्रशेखर हा अमेरिकेत पेट्रोल पंपावर पार्ट टाइम जॉब करत होता. शुक्रवारी रात्री तो पेट्रोल पंपावर काम करत असताना अज्ञाताने गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

चंद्रशेखर पोल हैदराबादमधील कॉलेजमधून डेंटल सर्जरीमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या टेक्सास येथे गेला होता. याचदरम्यान ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी डलासमधील पेट्रोल पंपावर काम करताना अज्ञात गुंडाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सध्या अमेरिकेतील पोलीस्नी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. मात्र मारेकऱ्याला अद्याप अटक करण्यात आली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.