
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर राजापूर तालुक्यातील ओणी नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनाच्या जोरदार धडकेमुळे बिबट्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा जीव गेला. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 3 च्या सुमारास मौजे ओणी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे लांजा ते राजापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग 66 वर एक वन्यप्राणी मृत अवस्थेत पडल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तात्काळ वनविभागाला दूरध्वनीद्वारे दिली. माहिती मिळताच राजापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांना कळवून तातडीने सर्व स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली.
वनविभागाने पाहणी केली असता, लांजा ते राजापूर जाणाऱ्या महामार्गाच्या उजव्या बाजूला एक नर बिबट निपचित पडलेला आढळून आला. जवळ जाऊन पाहणी केली असता, अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे बिबट्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याचे दिसून आले. या गंभीर जखमांमुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने नोंदवला आहे.
यानंतर, पशुधन विकास अधिकारी वैभव चोपडे, राजापूर यांनी सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय ३ ते ४ वर्षे होते, अशी माहिती वनविभागाने दिली आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात आली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.