नवरात्रोत्सवात मुंबईत दिवसाला 624 घरांची विक्री, नोंदणीतून सरकारच्या तिजोरीत 587 कोटींचा महसूल

यंदाच्या नवरात्रोत्सवात मुंबईत 6238 घरांची नोंदणी झाली आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी 624 घरांची विक्री झाली असून स्टॅम्प डय़ुटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत 587 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीपेक्षा यंदाच्या नवरात्रीत घरांच्या विक्रीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी नवरात्रीत 5199 घरांची म्हणजेच दिवसाला 587 घरांची विक्री झाली होती.

यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या काळात म्हणजेच 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत किती घरांची विक्री झाली याचा अभ्यास ‘नाईट फ्रँक’ या संस्थेने केला होता. त्यातून ही माहिती समोर आली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी असलेल्या पितृपक्षात अनेकजण शुभ काम करणे टाळतात. मात्र यंदाच्या पितृपंधरवडय़ात 3368 घरांची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या पितृपंधरवडय़ाच्या तुलनेत ही वाढ 5 टक्क्यांनी अधिक आहे.

नऊ महिन्यांत 1,11,939 मालमत्तांची नोंदणी

यंदाच्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत तब्बल 1 लाख 11 हजार 939 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. या मालमत्तांच्या नोंदणीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत 11 हजार 141 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सर्वाधिक म्हणजे 15 हजार 501 मालमत्तांची नोंदणी मार्चमध्ये त्यापाठोपाठ 13 हजार 80 मालमत्तांची नोंदणी एप्रिलमध्ये झाली आहे. सर्वात कमी म्हणजेच 11 हजार 230 मालमत्तांची नोंदणी ऑगस्टमध्ये झाली.