
पुण्यातील मेट्रोच्या कामात भाजपच्या लोकांनी 12 हजार कोटी रुपये खाल्ले आहेत. यात मिंधे गटाचे दोन लोपं आहेत. या चार-पाच लोकांनी हा बारा हजार कोटी रुपयांचा मलिदा खाल्ला आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. पुण्याचे प्रशासन तीन टोळीप्रमुखांनी वाटून घेतले असून हे टोळीप्रमुख पुणे चालवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
खासदार संजय राऊत हे शनिवारी पुणे दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार संजय राऊत म्हणाले, पुण्यातील प्रशासन हे तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतले आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात एक टोळी चालवतात. त्यांनी त्यांचा एक माणूस पुण्याचा पोलीस आयुक्त म्हणून नेमला आहे. नगर विकास मंत्र्याची एक टोळी असून त्यांनी महापालिका आयुक्त नेमला आहे. तर अजित पवारांच्या तिसऱया टोळीने आपला जिल्हाधिकारी नेमला आहे. हे टोळी प्रमुख पुणे चालवत आहेत. त्यासाठी त्यांनी आपले सुभेदार पैसे गोळा करण्यासाठी या ठिकाणी नेमले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारकीर्द पाहिल्यास त्यांचे आत्तापर्यंत कोणतेही भरीव कार्य पाहायला मिळत नाही. ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करतात. त्यांचे कुटुंब अधिकृतपणे भाजपचे कार्यकर्ते आहेत. हे पोलीस आयुक्त प्रसिद्धीसाठी कधीतरी गुंडांची धिंड काढतात. मुंबईचे पोलीस आयुक्त एकटे फिरतात. मात्र, पुण्याचे पोलीस आयुक्त गुंडांना घाबरून मोठा ताफा घेऊन फिरत असतील तर तो वर्दीचा अपमान आहे. त्यांनी वर्दी काढून फिरायला हवे, असा टोलाही खासदार राऊत यांनी लगावला.