IND vs WI – पहिली कसोटी, तिसरा दिवस; विजय डाऊनलोड केला!

>> संजय कऱ्हाडे

विंडीजविरुद्धचा विजय फारच सोपा होता. तिसऱया दिवशीच्या चहापानापर्यंत विजय लपेटण्याची नव्या पिढीची झटपट पद्धत मला आवडली. कौतुक वाटलं! हेच आणि असंच चौथ्या दिवशी होईल असा माझा अंदाज होता…

दुसऱया दिवशी अखेरीस हिंदुस्थानी संघाला मिळालेली 286 धावांची बढत शुभमनसाठी पुरेशी होती तर गोलंदाजांसाठी डोंगराएवढी! ‘भरपूर आहे ही आघाडी, विंडीजांना शनिवारीच बाद करू आणि रविवारी महिला क्रिकेटपटूंनी पाक संघाला चारी मुंडय़ा चीत करण्याचा आनंद लुटू,’ असं बहुधा त्यांनी शुभमनला सांगितलं असावं!

सिराज, जाडेजा, कुलदीप, सुंदर मंडळीने कामही चोख निभावलं. आजची कडक शाबासकी द्यायला हवी ती आपल्या क्षेत्ररक्षकांना. तेजनारायण चंदरपॉलने सिराजला मारलेला पूल फसला आणि स्क्वेअर लेगला डावीकडे झेपावलेल्या नितीशकुमारच्या हातात आला तेव्हा नितीश जमिनीशी समांतर दोन फूट हवेत होता! त्या वेळी नितीशचं नाव जॉण्टी भासलं!

इंग्लंडच्या दौऱयावर हाताला लागलेलं तूप धुण्याचा जयस्वालने कालपर्यंत केलेला प्रयत्न यशस्वी झाला. शे होपचा बॅक कट गलीत त्याने पुढे लोळण घेत पकडला तेव्हा त्याला स्वतःला त्याची खात्री पटली असेल. शाबास यशस्वी!

ब्रॅण्डन किंगची फलंदाजी तर जणू जाडेजाच्या अचूकतेची गुलाम! खरं तर जाडेजा बूटखुणा नसलेल्या बाजूला गोलंदाजी करत होता, पण त्याच्या अचूकतेने किंगला जखडून ठेवलं. एका बाहेर जाणाऱया चेंडूला तो मागच्या पायावर अधिरतेने खेळला आणि कड घेऊन निघालेला चेंडू राहुलने आणखी एका राहुलची आठवण देत झेलला. दुसऱया राहुलने हिंदुस्थानतर्फे खेळताना स्लिपमध्येच दोनशे दहा झेल घेतलेले आहेत!

जगातले भलेभले, थोरे-मोठे फलंदाज कुलदीपच्या हातून निघणाऱया जादूई लाल गोळय़ासमोर कसे चक्रावतात हे तर आपण पाहिलेलंच आहे. कप्तान चेस फलंदाज म्हणून थोर नाही अन् मोठाही नाही. खुळय़ासारखा सरळ चेंडूला फसला!

अर्थात, एक बाजू लढवणाऱया एथनेझला मात्र बाद केलं सुंदरने. बूट खुणांच्या मदतीने. बॅटची वरकड घेऊन उडालेला झेल सुंदरने छान घेतला. अधिक चांगल्या खेळपट्टीवर एथनेझ चमकदार फलंदाजी करू शकेल. आणखीही काही हेल्मेट, पॅड, ग्लोव्हज घालून आले न् गेले!

कालचा विजय मिळवल्यासारखा नाही, डाऊनलोड केल्यासारखा वाटला!