
नळापासून ते घरगुती छळापर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिवसेनेच्या शाखेत मिळतात. शिवसेनेच्या शाखा म्हणजे जनता दरबार आहे. आता मी नुसता शाखाप्रमुखावर समाधानी नाही. मला प्रत्येक शाखेत गटप्रमुख हवा आहे. संघटनेची बांधणी जोपर्यंत भक्कम होत नाही तोपर्यंत सभेला रिकाम्या खुर्च्या असून विरोधक जिंकले कसे आणि भरलेलं मैदान असून आपण हरलो कसे याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक बूथप्रमुखाने घराघरात शिवसेनेचे काम पोहचवले पाहिजे. बूथप्रमुखांची आणि गटप्रमुखांची यंत्रणेची बांधणी अधिक मजबूत केल्यास किमान पुढची पंचवीस वर्षे आपल्या सत्तेला कोणी धक्का लावू शकणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेतर्फे पुण्यात शाखाप्रमुख आणि पदाधिकारी संवाद मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिला. याप्रसंगी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवत्ते व जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान, मुंबई महापालिकेच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, राज्य संघटक वसंत मोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आदी उपस्थित होते.
मुंबईतील मतचोरीचा पर्दाफाश करणार
भाजपने यंत्रणेला पाडलेली भोकं बुजवली पाहिजेत. मतदार यादीत घुसवलेले बोगस मतदार शोधून त्यांना बाद केल्यानंतर आपण निवडणुका नक्की जिंकू. देशात झालेल्या मतचोरीची पोलखोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे केली त्याप्रमाणे आपणही मुंबईमध्ये झालेल्या मतचोरीचा पर्दाफाश करणार आहोत. यामुळे मतचोरीसह बोगस मतदारांची आपण नाकाबंदी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
बोगस मतदार आढळला तर कानाखाली आवाज काढा
एका बूथप्रमुखाने मतदार यादीतली अडीचशे घरांपर्यंत पोहचून त्या घरात आपले मतदान आहे की नाही? त्याच्या मनात आपल्या पक्षाबद्दल काय प्रश्न आहेत याची माहिती घ्या. मतदारांना नावानिशी, चेहऱयानिशी ओळखण्यासाठी पोलिंग एजंटसुद्धा बूथप्रमुखाच्या टीममधील हवा. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानादिवशी कोणी बोगस मतदार आलाच तशी खात्री झालीच तर त्याच्या कानाखाली लगावा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना यावेळी दिल्या.
































































