ट्रायडंटचे मालक राजिंदर गुप्ता यांना ‘आप’चे राज्यसभेचे तिकीट

ट्रायडंट समूहाचे मालक व प्रसिद्ध उद्योगपती राजिंदर गुप्ता यांना आम आदमी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या राज्यसभेवर जाण्याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

पंजाब विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी 24 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या संजीव अरोरा यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. अरोरा हे सध्या पंजाब सरकारमध्ये मंत्री आहेत. अरोरा यांच्या जागी केजरीवाल स्वतः राज्यसभेवर जातील असे बोलले जात होते, मात्र ती चर्चा फोल ठरली आहे. पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे राजिंदर गुप्ता यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मूळचे पंजाबमधील भटिंडाचे असलेले राजिंदर गुप्ता हे ट्रायडेंट उद्योग समूहाचे संस्थापक आहेत. टेक्सटाइल, पेपर आणि केमिकल अशा विविध क्षेत्रांत हा समूह कार्यरत आहे. 2002 साली गुप्ता यांनी ट्रायडंटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या ते मानद अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.