वणीमध्ये शिवसैनिकांनी उईकेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवले

राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिह्याचे पालकमंत्री प्रा. अशोक उइके आज वणी येथे आले असता शिवसैनिकांना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. नुसता आढावा कसला घेता; ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि सोयाबिनला हमीभाव द्या अशा मागण्या यावेळी शिवसैनिकांनी केल्या.

आदिवासी विकास मंत्री उइके यांचा आज नियोजित दौरा होता. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार होते. मात्र केवळ बैठकांचा फार्स कशाला असा सवाल करीत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. कर्जमाफी, सोयाबिनला विशेष पॅकेज अशा मागण्या करीत शिवसैनिकांनी उइके यांच्या गाडीसमोर लोटांगण घातले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिकांनी गनिमी काव्याने काळे झेंडे दाखवून सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला. सरकार फक्त पैसे घेण्यासाठी आढावा बैठकांचा फार्स करीत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ आणि कर्जमाफीची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुका-शहरप्रमुख विनोद ढुमणे, सुधीर थेरे, गीता उपरे यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.