
अर्नाळा गावातील बंदरपाडा परिसरातील गोवारी कुटुंबाच्या घरावर रविवारी मध्यरात्री एका हल्लेखोर तरुणाने वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या मुलीवर चॉपरने वार केले. या हल्ल्यात हे तिघेही गंभीर जखमी असून त्यांना विरार येथील सहयोग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत.
विरार पश्चिमेच्या अर्नाळा बंदरपाडा गावात प्राध्यापक सचिन गोवारी यांचे कुटुंब राहते. प्रा. गोवारी हे अथर्व क्लासेसचे संचालक आहेत. या व्यवसायानिमित्त ते आगाशी गावात राहतात. त्यांचे वडील जगन्नाथ गोवारी (76), आई लीला गोवारी (72) बहीण नेत्रा गोवारी (52) त्या ठिकाणी राहतात. त्यांच्या अर्नाळा येथील घरावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण चॉपर घेऊन घुसला. यावेळी घरात जगन्नाथ गोवारी, लीला गोवारी, नेत्रा गोवारी हे झोपले होते. हल्लेखोराने या तिघांवरही चॉपरचे वार केले. यात हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांची आरडाओरड ऐकल्यानंतर स्थानिक रहिवासी त्यांच्या मदतीला धावले. या घटनेची अर्नाळा सागरी पोलिसांना मिळाल्यानंतर तेही घटनास्थळी आले. जखमींना विरार येथील सहयोग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
हल्लेखोरांचा शोध सुरू
जखमींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच आहेत. घरात दरोड्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या हल्ल्यामागे दरोडा किंवा चोरी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी जोरदार फिल्डिंग पोलिसांनी लावली आहे. लवकर आरोपींना अटक होईल, अशी प्रतिक्रिया परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.
रहिवाशांमध्ये घबराट
भरवर्दळीच्या भागात असलेल्या गोवारी कुटुंबाच्या घरावर सशस्त्र हल्ला झाल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. यापूर्वी असा रक्तरंजित थरार या भागात कधीच घडला नव्हता. परिसरात भाडेकरूंची संख्या वाढल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.