
बॉलीवूड कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीय. या जोडप्यावर एका व्यक्तीने 60 कोटींची फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून शिल्पाला दिलासा मिळालेला नाही. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने लूकआऊट नोटीस जारी केली होती. याच कारणामुळे दोघांनाही तपास संस्था आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेश प्रवास करता येणार नाही.
शिल्पा शेट्टीला एका युट्युबच्या इव्हेंण्टसाठी कोलंबोत जायचे होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने तिला देशबाहेर जाण्याची परवानगी नाकारली. शिल्पा शेट्टीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, शिल्पा शेट्टीला 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान एका युट्युबच्या इव्हण्टसाठी कोलंबोत जावे लागणार आहे. त्यावेळी न्यायालयाने त्या इव्हेण्टची निमंत्रण पत्रिका मागितली. त्यावेळी वकिलाने सांगितले की, तिला फोनवरुन निमंत्रण मिळाले आहे, त्याची पत्रिका तिथे पोहोचल्यावरच देण्यात येईल.
मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यावेळी न्यायालयाने सांगितले की, तिने प्रथम फसवणुकी प्रकरणातील 60कोटी रुपये भरावेत आणि नंतर ते परदेशात जाण्याची परवानगी मागू शकतात. या प्रकरणाची सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी आहे.
उद्योगपती दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या जोडप्याने प्रथम त्यांना 60 कोटी रुपये गुंतवण्यासाठी फसवले आणि नंतर ते पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले.