फुटबॉल विश्वातील रोनाल्डो पहिला अब्जाधीश

फुटबॉल सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोचला. यावेळी मात्र हा विक्रम गोल किंवा ट्रॉफीसाठी नव्हे, तर त्यांच्या अभूतपूर्क संपत्तीसाठी आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार रोनाल्डोची एकूण मालमत्ता 1.4 अब्ज अमेरिकी डॉलर्स (सुमारे 11,500 कोटी रुपये) इतकी झाली आहे. त्यामुळे तो फुटबॉल इतिहासातील पहिला अब्जाधीश खेळाडू ठरला आहे.

ब्लूमबर्गने सांगितले की, ही पहिलीच वेळ आहे जेव्हा रोनाल्डोची संपत्ती या प्रतिष्ठीत इंडेक्समध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या मूल्यमापनामुळे तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू ठरला असून, त्याने आपला दीर्घकालीन प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.

वेतन आणि क्लब करीअर

रोनाल्डोच्या कमाईचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे त्याचे वेतन. युरोपमध्ये खेळताना त्याचे वेतन मेस्सीच्या जवळपास होते, मात्र 2023 मध्ये सौदी अरेबियातील अल-नस्र क्लबशी करार केल्यानंतर त्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. या करारानुसार रोनाल्डोला दरवर्षी 200 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (करमुक्त) वेतन आणि बोनस मिळतो, तसेच त्याला 30 दशलक्ष डॉलर्सचा साइनिंग बोनसही देण्यात आला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार 2002 ते 2023 दरम्यान रोनाल्डोने एकूण 550 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक वेतन कमावले आहे.