अखेर सिडनहॅममधील विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या, विद्यार्थ्यांनी मानले युवासेनेचे आभार

सिडनहॅम महाविद्यालयात मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीजमध्ये (एमएमएस) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तीन महिन्यांहून अधिक काळ रखडल्या होत्या. मात्र, युवासेनेच्या दणक्याने महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवासेनेचे आभार मानले आहेत.

चर्चगेट येथील सिडनहॅम महाविद्यालयातील मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा मुंबई विद्यापीठाचा निकाल जून, 2025 मध्ये जाहीर करण्यात आला आहे, परंतु महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचा एबीसी आयडी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या नाहीत. सिडनहॅम महाविद्यालय हे शासकीय महाविद्यालय असल्याने तेथे सर्व विद्यार्थी गुणवत्तेने प्रवेश घेतात, त्यांना प्लेसमेंटसुद्धा त्वरीत मिळते. परंतु गुणपत्रिका नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना संधी गमवावी लागली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे धाव घेतली. शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे प्राप्त तक्रारींची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी सिडनहॅम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रीनिवास धुरे यांची भेट घेत हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.

प्राचार्य डॉ. धुरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आजच नवीन साच्यात सर्व माहिती विद्यापीठाला देण्याचे आश्वासन दिले तसेच पुलगुरू डॉ. प्रा. रविंद्र पुळकर्णी यांना संपर्प साधून माहिती दिली असता त्यांनी याबाबत तातडीने अधिकाऱ्यांना सूचना देऊन ज्या महाविद्यालयांनी आजतागायत आयडी अपडेट केले नाही त्यांनी तातडीने विहित नमुन्यात माहिती देऊन आयडी तयार करुन घ्यावेत आणि त्यांना गुणपत्रिका लवकरात लवकर वितरीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सिडनहॅम महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची माहिती एका दिवसात भरून दिल्यावर विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा एबीसी आयडी तयार करून त्वरीत गुणपत्रिका देण्यास सुरुवात केली आहे.