
तब्बल साडेपंचवीस कोटी रुपयांचे भाडे थकवणाऱ्या आणि किंग्ज सर्कल येथील नव्या जागेत कार्यालय स्थलांतर करूनही म्हाडा भवनातील जुने कार्यालय रिक्त न करणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्राधिकरणाला (डीआरपी) म्हाडाने जोरदार दणका दिला आहे. गृहनिर्माण भवनातील डीआरपीला भाडय़ाने दिलेले हे कार्यालय आता म्हाडाने ताब्यात घेतले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डीआरपीचे कार्यालय म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या पाचव्या मजल्यावर आहे. सुमारे सात हजार चौरस फुटाच्या या प्रशस्त कार्यालयासाठी म्हाडा दरमहा 265 रुपये प्रति चौरस फूट दराने भाडे आकारते. गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत भाडे आणि व्याजाची रक्कम मिळून डीआरपीने साडेपंचवीस कोटी रुपये भाडे थकवल्याचे समोर आले आहे. म्हाडाने वारंवार नोटीस पाठवूनदेखील डीआरपीने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यातच गेल्या वर्षी दिवाळीला डीआरपीने किंग्ज सर्पल येथील नवीन जागेत कार्यालय शिफ्ट केले. थकीत भाडे तर सोडाच डीआरपीने जुन्या कार्यालयाचा ताबादेखील म्हाडाला दिला नव्हता.
येत्या काळात म्हाडा हॅपीनेस इंडेक्स, विक्रीअभावी धूळ खात पडलेल्या घरांची विक्री, घरे भाडेतत्त्वावर देण्यासाठी रेंटल पॉलिसी अशा महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत आहे. त्यासाठी लागणाऱ्या स्टाफला बसण्यासाठी म्हाडाकडे पुरेशी जागा नाही. डीआरपी कार्यालय रिक्त झाल्यामुळे या जागेत आता या स्टाफला बसवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.





























































