
मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहरभर जागोजागी बेकायदेशीरपणे बॅनर्स लावण्यात आले. त्या बॅनर्सनी मुंबईचे विद्रुपीकरण झाले आहे. रस्त्यावरील दिवे, पदपथावर लावलेल्या बॅनर, होर्डिंग्जमुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे. संबंधित बेकायदा बॅनर्सवर शिवसेनेच्या शिव विधी व न्याय सेनेने तीव्र आक्षेप घेतला आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. बेकायदेशीर बॅनर्सच्या प्रकरणात गांभार्याने लक्ष घालून कारवाई करा, अशी मागणी शिव विधी व न्याय सेनेने केली आहे.
रस्त्यांवरील दिवे, पदपथावर बेकायदा बॅनर, होर्डिंग्ज लावण्यास मुभा देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. या निर्देशांच्या अंमलबजावणीवर न्यायालय लक्ष ठेवून आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्या निर्देशांचे उल्लंघन करण्यात आले. शहरातील रस्ते, पदपथ आणि स्ट्रीटलाईटवर बेकायदा बॅनर्स उभारण्यात आले. यासंदर्भात शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष ऍड. नितीश सोनवणे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. पंतप्रधानांचे स्वागत करणारे बेकायदा बॅनर्स जागोजागी लावण्यात आले. त्यामुळे मुंबई शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. मरीन ड्राइव्ह येथील दुभाजकांच्या मध्यभागी, पदपथांवर आणि रस्त्यांच्या कडेला बॅनर्स लावण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षांचेही फोटो झळकवले. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेकडून घेतलेल्या परवानगीची माहिती लेखी किंवा क्यूआर कोड स्वरूपात प्रदर्शित केली नाही याकडेही लक्ष वेधण्यात आले असून कारवाईची मागणी केली आहे.
बेकायदा बॅनर्स, होर्डिंग्ज कोसळून पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर बेकायदा बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्याचे सत्र सुरू आहे. ही गंभीर परिस्थिती असून याकामी हस्तक्षेप करून मुंबईसह अन्य शहरांचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आणि नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश द्या, अशी विनंती शिव विधी व न्याय सेनेने विधानसभा अध्यक्षांना केली आहे.