
पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आणि बॉडी-बिल्डर वरिंदर सिंह घुमनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वरिंदर सिंह घुमन फिटनेससह अॅक्टिंग क्षेत्रातही अव्वल होता. वरिंदर सिंह घुमनने बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या बॉडी बिल्डींगची सर्वत्र चर्चा होती. वरिंदर सिंह हा सर्वात पहिला शाकाहारी बॉडी बिल्डर होता. त्याने त्याच्या बॉडी बनवण्यासाठी अनेक परिश्रम घेतले होते.
फिटनेस आणि डाएट प्लॅन्सची आपल्या शरीराला गरज असतेच. मात्र कधी कधी त्याच्या अतिरेक केल्याने, एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. परफेक्ट बॉडीच्या नादात आतापर्यंत अनेक मोठ्या बॉडी बिल्डर्स आणि कलाकारांनी आपला जीव गमावला. दरम्यान आणखी एक दुख:द घटना आता समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बायसेप्सच्या दुखापतीसाठी त्याला मृतसरमधील एका रुग्णालयात किरकोळ शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया गंभीर नसल्याने शस्त्रक्रियेसाठी तो एकटाच गेला होता. मात्र त्याचवेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
2005 मध्ये वरिंदर सिंग घुमान याने मिस्टर जालंधरचा किताबवर नाव कोरलं होतं. त्यानंतर त्याने मिस्टर पंजाबचा किताब जिंकला. 2009 मध्ये मिस्टर एशिया स्पर्धेत वरिंदर दुसऱ्या क्रमांकावर होता. तसेच आयएफबीबी प्रो कार्ड मिळवणारा पहिला हिंदुस्थानी बॉडीबिल्डर आहे.
वरिंदरची शेवटची पोस्ट होतेय व्हायरल
पंजाबी गायक राजवीर जावंदा याचे 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले. त्याचा शिमलामध्ये गंभीर दुचाकी अपघात झाला होता. यानंतर राजवीर याला मोहाली, पंजाब येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 11 व्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली.
View this post on Instagram
दरम्यान वरिंदरने राजवीरबद्दल दुःख व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती. “RIP भावा, पंजाबी संगीत उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. वाहेगुरु तुझ्या कुटुंबाला हे दुख:सहन करण्याची शक्ती देवो. या कॅप्शनस वरिंदरने राजवीरचा फोटो शेअर केला होता. याच्या एक दिवसानंतरच वरिंदर सिंह यांने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.