मान्सूनची मुंबईतून एक्झिट, उर्वरित महाराष्ट्रातून दोन दिवसांत माघारी परतणार

यंदाच्या हंगामात समाधानकारक हजेरी लावलेल्या मान्सूनने अखेर शुक्रवारी मुंबईतून काढता पाय घेतला. सात वर्षांत पहिल्यांदा मान्सूनने इतक्या लवकर मुंबई शहरातून माघार घेतली आहे. हवामान खात्याने मान्सूनच्या एक्झिटची अधिपृत घोषणा केली. पुढील दोन दिवसांत उर्वरित महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतेल. त्याचबरोबर गुजरातचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा बहुतेक भाग तसेच बिहारच्या काही भागांमधून मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरू झाला आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले.

अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला होता. मान्सूनची मुंबईतून माघार घेण्याची सामान्य तारीख 8 ऑक्टोबर आहे. मात्र गेल्या आठवडय़ात शहर आणि उपनगरांत हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी लागली होती. मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी मान्सूनने मुंबईतून काढता पाय घेतला. गेल्या सात वर्षांतील मुंबईतील ही सर्वात पहिली मान्सूनची माघार आहे. 2006 नंतर म्हणजेच जवळपास दोन दशकांतील दुसरी सर्वात लवकर माघार आहे. गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सूनने माघार घेतली होती. त्याआधी 2023 आणि 2022 मध्ये मान्सूनचा माघारीचा प्रवास दोन आठवडय़ांपेक्षा जास्त उशिराने झाला होता. मान्सूनने यंदाच्या हंगामात जोरदार हजेरी लावली. मुंबईत 1950 नंतर यंदा सर्वात लवकर मान्सूनची सुरुवात झाली होती. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत शहरात 3,100.4 मिमी पाऊस पडला. तसेच ऑक्टोबरमध्ये उपनगरांमध्ये 32 मिमी आणि कुलाबा स्टेशनवर 72 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती.

मान्सूनच्या परतीची रेषा

पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी जाणार आहे. मान्सूनच्या परतीची रेषा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी आणि रक्सौल या मार्गांमधून जात आहे.  मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातून मान्सूनचा प्रभाव कमी होत चालला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल; परंतु राज्यात उबदार हवामान आणि आर्द्रता कमी होण्यास सुरुवात होईल, असे हवामान विभागाच्या तज्ञांनी स्पष्ट केले. गेल्या आठवडय़ात सक्रिय झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून तो कमी दाबाचा पट्टा विरल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.