प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीसाठी कंपनीचे कार्यालय वरोर गावातील हद्दीत बांधण्याचा डाव; स्थानिकांवर पोलीस बळाचा वापर

प्रस्तावित वाढवण बंदर उभारणी न्यायप्रविष्ट आहे. बंदर उभारणीसाठी बांधण्यात येणारे ITD cementation कंपनीचे प्रस्तावित ऑफिसही बेकायदेशीर आहे, असे असतानाही वरोर आणि वाढवणं गावात पालघर पोलिसांकडून ग्रामस्थांवर बळाचा वापर होत आहे. पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांना गुन्हेगार असल्याची वागणूक मिळत असल्याने पोलीस प्रशासनाचा भूमिपुत्रांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीसाठी ITD cementation कंपनीचे कार्यालय वरोर गावातील हद्दीत बांधण्याचा डाव असून या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी ( दिनांक ११/१०/२०२५ रोजी ) करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात JNPA प्राधिकरणाने दाखल केलेल्या कामांचा तपशिलवार मध्ये पान क्रमांक १६, मुद्दा क्रमांक B3 मध्ये नमूद केले आहे कामाची सुरुवात वरोरमधील किनाऱ्याजवळील जमीन संपादित केल्यानंतर होईल. सदर जमीन भाडेतत्त्वावर ITD कंपनीकडून घेण्यात आली असून अद्याप या व्यवहाराला ग्रामपंचायत वरोर ह्यांच्याकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सदर कामाला ग्रामपंचायत वरोर ह्यांच्याकडून परवानगी मिळाली नसताना करण्यात येणारे हे काम पूर्णता बेकायदेशीर आहे. मात्र, पोलीस बळाचा वापर करून स्थानिक जनतेवर दबाव टाकण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

गावकऱ्यंचा विरोध असून सुध्दा पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांना गुन्हेगार असल्याची वागणूक मिळत असल्याने पोलीस प्रशासनाचा भूमिपुत्रांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.