
काल मराठवाड्यात कटप्रमुखांचा मेळावा झाला आणि मिंधेंनी त्यांना मार्गदर्शन केलं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच आता उद्धव ठाकरे यांनी फक्त आदेश द्यावा, दिवाळीनंतर मंत्रालयावर धडक मारू असेही अंबादास दानवे म्हणाले.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट हंबरडा मोर्चा निघाला. त्यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यात सरकारने वर्गीकरण केले आहे. त्यात सरकारने पूर्वी दिलेले 2200 कोटी रुपये, विमा 5 हजार रुपये. विम्याचा क्लेम नाही तर पाच हजार रुपये कुठून देणार? पीक नुकसान NDRF 6 हजार 175 कोटी रुपये. पीक नुकसान राज्य सरकार 6500 कोटी रुपये, पायाभूत सुविधा 10 हजार कोटी रुपये, जीवित आणि वित्त हानी 1700 कोटी रुपये. एकूण 31 हजार 628 कोटी रुपये. यातली कुठलीही मदत सरकारने दिली नसेल तरी सरकारला NDRF ची मदत द्यावी लागेल. सरकार खोटं बोलतंय, शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय. सरकारने दिलेले 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज नाही. ही फसवणूक आहे आणि सरकार फसवतय. काल परवा काही लोक इथे येऊन गेले. इथे गटप्रमुख ऐवजी कटप्रमुख आले होते. त्या कटप्रमुखांना त्यांनी मार्गदर्शन केलं. यांना फक्त हंबरडा दिसत होता, तीन तारखेपासून मराठवाड्यातील लोक पेटून उठले आणि एका आठवड्यात हा विराट मोर्चा निघाला. तुम्ही फक्त आदेश द्या, दिवाळीनंतर आम्ही मंत्रायलयावर धडक मारू आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा एल्गार पेटवू असेही अंबादास दानवे म्हणाले.