साय-फाय – नात्यांच्या गुंतागुंतीवर AI चा सल्ला

>> प्रसाद ताम्हनकर

काही वर्षांपूर्वी नुकतेच बाळसे धरू लागलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान इतक्या वेगाने प्रगती करेल आणि जगाला आपल्या कवेत घेईल असे फार कमी लोकांना वाटले असेल. AI तंत्रज्ञानाचा वेग थक्क करणारा आहे. आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात Aघ् तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. मोठमोठय़ा उद्योगांच्या जोडीने लहान व्यावसायिक आणि अगदी सामान्य वापरकर्तेदेखील या तंत्रज्ञानाची मदत आपल्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींसाठी घेत आहेत. सॉफ्टवेअरचा कोड लिहिण्यापासून ते एखाद्या गाण्याला संगीत देणे, विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यास मदत करणे किंवा अनेकदा तर ते प्रोजेक्ट पूर्णपणे तयार करून देणे अशा अनेक मार्गांनी AI सामान्य माणसाचीदेखील मदत करतो आहे. मात्र आपल्या अभ्यास आणि व्यवसायातील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता अनेक लोक नात्यांची गुंतागुंत
सोडवण्यासाठी AI ची मदत घेत असल्याचे समोर आले आणि हा विषय एकदम चर्चेत आला.

एका अभ्यासानुसार सध्याच्या जेन झी अर्थात नव्या पिढीतील अनेक जण आपल्या जोडीदाराशी असलेले संबंध कसे सुधरवता येतील, जोडीदाराच्या एखाद्या वागण्याचा व बोलण्याचा काय अर्थ काढता येईल, एखादे म्हणणे जोडीदारापर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य शब्दांची रचना कशी असावी या सगळ्याबरोबरच नात्यात आपल्याकडून घडलेल्या एखाद्या चुकीचे समर्थन कसे करावे, संबंध पूर्णपणे तोडण्यासाठी कटू न वाटणाऱया शब्दात संदेश कसा लिहावा, जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर मनाला कसे सावरावे इथपर्यंतच्या प्रश्नांसाठी Aघ् चा सल्ला घेत आहेत. तज्ञांच्या सांगण्यानुसार Aघ् ला सल्ल्यासाठी विचारल्या जाणाऱया प्रश्नापैकी निम्मे प्रश्न हे शारीरिक संबंधांच्या संदर्भातील असतात.

जगभरातील मानसोपचार तज्ञ, नात्याच्या, विवाहाच्या संदर्भातील सल्लागार व सध्या फक्त आणि फक्त अशा प्रश्नांवर सल्ला देण्यासाठी AI Apps बनवणारे उत्पादक हे आपापल्या नजरेने या प्रकाराकडे बघत आहेत. AI च्या मदतीने दोन माणसांच्या नात्यात सुधारणा होत असेल, त्यांना त्यांच्या नात्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळत असेल किंवा नको असलेल्या नात्यातून अलगद सुटका करून घेण्यास मदत मिळत असेल तर हरकत काय आहे? असा प्रश्न अशा AI चे उत्पादक विचारत आहेत. दुसरीकडे नात्यातील एखाद्या गुंतागुंतीवर मानवी भावनेद्वारे, तरल मनःस्थितीद्वारे मानव जसा विचार करेल आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल तसे फक्त माहितीच्या साठय़ावर आधारित निर्माती असलेल्या AI ला शक्य आहे का? असा प्रश्न काही मानसोपचार तज्ञांनी आणि सल्लागारांनी उपस्थित केला आहे.

AI ने दिलेला सल्ला मानवी नात्यात कितपत उपयोगाचा आहे हा मुख्य प्रश्न आहे. अनेकदा एखादा संदेश लिहिण्यासाठी किंवा एखादी भावना पोहोचवण्यासाठी AI च्या मदतीने शब्दरचना केली जाते. मात्र ही शब्दरचना अत्यंत कृत्रिम वाटते आणि ती समजून घेताना समोरच्या माणसाचा प्रचंड गोंधळ उडतो याकडेदेखील तज्ञ लक्ष वेधतात. मुख्य म्हणजे आपल्या नात्यांच्या प्रवासात आपण Aघ् ची मदत घेऊन एकप्रकारे स्वतची सोडवणूक तर करत नाही ना? पूर्णपणे AI वर अवलंबून गेल्यावर आपल्या भावनांचा, मानसिक चढ-उतारांचा सध्या जो काही प्रवाह आहे तो खंडित तर होणार नाही ना? आपली मानसिकतादेखील AI प्रमाणे बदलत जाणार नाही ना? हेदेखील प्रश्न आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा. एक योग्य सल्लागार सल्ला देताना कुठे थांबावे आणि काय सल्ला देणे टाळावे हे योग्य प्रकारे जाणतो व सल्ला घ्यायला आलेला कोणतीही अनुचित कृती करू नये यासाठी सजग असतो. AI ही सजगता सांभाळू शकणार आहे का? असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत असताना एखादी भीती, शंका, अडचण चारचौघांच्यात जाहीरपणे व्यक्त करणे ज्यांना शक्य होत नाही त्यांच्या मानसिक अस्वस्थतेला वाट मोकळी होण्यास मदत मिळत असेल तर ते फायद्याचे नाही का? हा प्रश्नदेखील दुसऱया बाजूने उभा केला जात आहे.

[email protected]