
मुंबई शहरातून मान्सूनने काढता पाय घेताच ‘ऑक्टोबर हीट’ची सुरुवात झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. भारतीय हवामान विभागानेही शहर आणि उपनगरांत ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता जाणवू लागल्याचे म्हटले आहे. शहरातील तापमान येत्या दिवसांत उष्ण आणि सरासरीपेक्षा जास्त पातळीवर राहणार आहे. कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यंदाच्या हंगामात मान्सूनने समाधानकारक हजेरी लावली. त्यानंतर अखेर शुक्रवारी मान्सूनने मुंबईतून माघारीचा मार्ग धरला. सात वर्षांत पहिल्यांदा मान्सूनने इतक्या लवकर मुंबई शहरातून माघार घेतली आहे. मान्सूनच्या एक्झिटनंतर लगेचच ऑक्टोबर हीटने डोके वर काढले आहे. अचानक कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने अनेक मुंबईकरांना अस्वस्थ वाटू लागले आहे.
हवामान शास्त्रज्ञांनी ऑक्टोबर हीटच्या सक्रीयतेबाबत दुजोरा दिला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे शहरात सध्या ‘ऑक्टोबर हीट’ अनुभवायला मिळत आहे. मुंबईसाठी ही एक सामान्य हवामान घटना आहे. यामुळे दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होते. दररोज तापमान 30-35 अंश सेल्सिअस दरम्यान वाढते, असे हवामान शास्त्रज्ञांनी म्हटले आहे .