झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून IED स्फोट, सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल शहीद

झारखंडमधील पश्चिमी सिंहभूमी जिल्ह्यात सरंडाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल शहीद झाले. महेंद्र लश्कर असे शहीद कॉन्स्टेबलचे नाव आहे. ओडिशातील रुग्णालयात उपचारादरम्यान लश्कर यांचा मृत्यू झाल्याचे झारखंड पोलीस मुख्यालयाने निवेदन जारी करत सांगितले.

जराईकेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सारंडा जंगलातील बाबुडीह परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात शहीद लश्कर यांच्यासह एक निरीक्षक आणि एक सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) देखील जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लश्कर यांना जखमी अवस्थेत ओडिशातील रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, झारखंडमध्ये नक्षलवादी संघटना सीपीआय (माओवादी) ने सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने जंगलातील रस्त्यांवर हे आयईडी पेरले होते. या घटनेनंतर, परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि आजूबाजूच्या भागात सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.