कुठे जाऊन बसता हो तुम्ही? अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना झापले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी तिलारी वेळेवर न आल्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले होते. वसईकर, कुठे जाऊन बसता हो तुम्ही? असे म्हणत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची सर्वांसमोर खरडपट्टी केली. दोन मिनिटे उशीर म्हणजे उशीरच असतो, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पहाटेपासूनच वारजे, अहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार यांनी वारजेतील चौधरी चौक येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांच्या तक्रारी या विषयांवर त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विकासकामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, नागरिकांना अडचण होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास शिवणे पूल पाण्याखाली जात असल्याने पूल उंच करण्याचे आदेश पवार यांनी दिले. वारजे-शिवणे पुलाची तसेच धायरी परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या धायरी डीपी रोड आणि कात्रज चौकातील उड्डाणपूल कामांचीही त्यांनी पाहणी केली.

शहरातील रस्ते, पूल आणि वाहतूक सुधारणा प्रकल्पांसंदर्भात अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करा, विकास हा फक्त कागदावर नाही, तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

देव-देव करू की विकासकामे

अहिरेगाव परिसरातील नागरिकांनी विविध तक्रारी मांडल्या. यावेळी स्थानिकांनी त्यांना मंदिरात येण्याची विनंती केली असता, पवार म्हणाले, मी पहाटे पाच वाजता उठतो. एकतर मला देव-देव करायला सांगा किंवा विकासकामे करायला सांगा. पवार यांच्या या मिश्किल वक्तव्याने नागरिकांमध्ये हशा पिकला.