महत्त्वाच्या बातम्या – कॅन्सरवरील उपचारांसाठी खास अणुभट्टी

रेडिओ आयसोटोपमध्ये स्वयंपूर्णता मिळवून कर्करोगावरील उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावे या उद्देशाने हिंदुस्थानी अणुऊर्जा विभाग आयसोटोपच्या उत्पादनासाठी विशाखापट्टणममध्ये एक विशेष अणुभट्टी उभारणार आहे, अशी माहिती भाभा अणु संशोधन केंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सरकारी व खासगी भागीदारीतून ही अणुभट्टी उभारली जाणार आहे. वैद्यकीय आयसोटोपच्या उत्पादनासाठी समर्पित असलेली हिंदुस्थानातील ही पहिली अणुभट्टी असेल. पुढील चार ते पाच वर्षांत तिचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

 

चर्मकार समाजाचा बुधवारी मोर्चा

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार संघाने बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याची घटना घडली तो 6 ऑक्टोबरचा दिवस काळा दिवस म्हणून जाहीर करावा अशी संघाची मागणी आहे. चेतना महाविद्यालयापासून मोर्चा काढला जाणार असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी सांगितले.