
पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या घातक प्रदूषणाच्या विरोधात सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिला असून यावेळी शिवसेनेचे अलिबाग-मुरुड विधानसभा संपर्कप्रमुख विष्णू पाटील उपस्थित राहणार आहेत.
वडखळ विभागातील गडब, डोलिवी परिसरात जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचा प्लाण्ट आहे. या प्लाण्टमधून घातक प्रदूषण होत असून या प्रदूषणाचा ग्रामस्थांना त्रास होत आहे. गडब येथील अनेक ग्रामस्थांनी विष्णू पाटील यांची भेट घेऊन प्रदूषणासंदर्भात व्यथा मांडली. जेएसडब्ल्यूच्या प्रदूषणाच्या निषेर्धात प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
कंपनीकडून होणारे घातक प्रदूषण हे थांबवायलाच पाहिजे. कंपनीने वेळोवेळी दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता करावी तसेच महिन्याभरात कंपनीने प्रदूषण रोखण्याकरिता तातडीने कारवाई करावी अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याची दखल कंपनीने व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन विष्णू पाटील यांनी केले आहे. ही कंपनी लवकरच तिसरा प्रकल्प उभारत असल्याने प्रदूषणामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे, असा दावा अॅड. तन्मय पाटील व समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी केला आहे.