शहापुरात प्लास्टिक कंपनीत आगडोंब, कामगार थोडक्यात बचावले

आसनगाव औद्योगिक क्षेत्रातील एस. के. आय. प्लास्ट या प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीत आगडोंब उसळला. आज सकाळी दहाच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच शहापूर नगरपंचायत, जिंदाल कंपनी, कल्याण-डोंबिवली व भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत 100 टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र कंपनीत प्लास्टिकच्या वस्तू व कच्चा माल असल्याने ही आग पसरली. रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. प्लास्टिक आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तूंमुळे ही आग पसरत गेली. या आगीत कंपनीतील सर्व माल जळून खाक झाला आहे, तर प्लास्टिकच्या वस्तू तयार करणाऱ्या मशिनरींचेही नुकसान झाले आहे.