
रेल्वे प्रवाशांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. आता लवकरच ‘वंदे भारत’ वातानुकूलित स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल.
किनेट रेल्वे सोल्युशन्स हे इंडो-रशियन जॉइंट व्हेंचर पुढील आठवडय़ात त्यांच्या पहिल्या एसी कोचच्या डिझाइनचे अनावरण करणार आहे. दिल्लीच्या भारत मंडपम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे इक्विपमेंट एग्झिबिशन 2025 मध्ये ते प्रदर्शित केले जाईल.
रेल्वे मंत्रालयाने लांब आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही किनेट रेल्वे सोल्युशन्सद्वारे तयार करण्यात येत आहे.
z किनेट रेल्वे सोल्युशन्स ही कंपनी 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स तयार करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी आघाडीच्या रशियन रोलिंग स्टॉक कंपन्या आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे.
z राष्ट्रीय वाहतूक कंपनीने वंदे भारत स्लीपर ट्रेन्सचे उत्पादन करण्याचे कंत्राट तीन कंपन्यांना दिले आहे. तसेच रेल्वेने दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन एकत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले होते की, दुसरी ट्रेन नियमित सेवेसाठी पूर्णपणे तयार झाल्यानंतरच लॉन्च होईल. ही ट्रेन बीईएमएलने आयसीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. तसेच दुसरी ट्रेन तयार केली जात आहे आणि ती 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते.