
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. येथे बारावीच्या एका विद्यार्थ्याने 18 महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह पेटीमध्ये लपवून ठेवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायना येथील नित्यानंद नंगली गावात राहणाऱ्या पुष्पेंद्र नावाच्या एका व्यक्तीचा 18 महिन्यांचा मुलगा संध्याकाळी अचानक बेपत्ता झाला. माधव असे त्याचे नाव आहे. बाळ बेपत्ता झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. मात्र बऱ्याच ठिकाणी शोध घेऊनही बाळं सापडले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी माधव बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही तातडीने बाळाचा शोध सुरू केला. यावेळी संशयावरून पोलिसांनी शेजाऱ्यांच्या घरातही तपास केला. यावेळी शेजारी राहणाऱ्या 12 वीच्या विद्यार्थ्याच्या घरातील एका पेटीत या 18 महिन्यांच्य़ा बाळाचा मृतदेह आढळला. आरोपीने त्या बाळाला रजईमध्ये गुंडाळून मग पेटीत ठेवले होते. बाळाचा मृतदेह मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या आरोपी विद्यार्थ्याचे बाळाच्या पालकांशी काही कारणावरून मतभेद झाले होते. याचाच राग त्याच्या मनात होता. या द्वेषामुळे त्याने हा भयानक गुन्हा केला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुटुंबाशी चर्चा केली. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून नरसेना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कायदेशीर कारवाई सुरू करत आहेत.