नायगाव बीडीडीतील 864 कुटुंबे दिवाळीनंतर नव्या घरात, ओसी मिळाली नसल्यामुळे दिवाळीचा मुहूर्त हुकणार

नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील 8 इमारतींपैकी पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून ओसी मिळताच या रहिवाशांना नव्या घराचा ताबा दिला जाणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे 160 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 500 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार आहे. यापूर्वी वरळी बीडीडीतील दोन पुनर्वसित इमारतींमधील 556 रहिवाशांना 14 ऑगस्टला घरांचा ताबा देण्यात आला होता.

वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे बांधकाम कंत्राटदार एल अॅण्ड टी यांच्यामार्फत सुरु आहे. या प्रकल्पाचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 8 मधील टॉवर क्र. 4 ते 8 या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या रहिवाशांना दिवाळीत घरे देण्याचे म्हाडाचे नियोजन होते. त्यादृष्टीने म्हाडाने तयारी केली होती. अगदी रहिवाशांना इमारतीत देण्यात येणाऱ्या सुविधा, त्याचा वापर आणि काळजी कशी घ्यायची याबाबत म्हाडाने रहिवाशांना मार्गदर्शनदेखील केले होते.

नुकतीच अग्निशमन दलाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या इमारतींची पाहणी केली. या पाहणीत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काही बदल सुचवले आहेत. साधारण दोन ते तीन दिवसांचे हे काम आहे. हे काम पूर्ण होताच ओसीसाठी अर्ज केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

 नायगाव बीडीडी चाळीत 42 जुन्या चाळी असून त्यात 3289 निवासी आणि 55 व्यावसायिक गाळेधारक आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 23 मजली 20 पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. वरळीप्रमाणे नायगाव येथील पुनर्विकासात प्रत्येक रहिवाशाला स्वतंत्र पार्किंग मिळावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.