
दिवाळीच्या धामधुमीत चिपळूण तालुक्यात काळाने घाला घातला आहे. शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर वीज कोसळून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मुर्तवडे-बौद्धवाडी येथे बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुशील शिवराम पवार (३८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेले ८ जण जखमी झाले आहेत. या घटनेने चिपळुणात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी सायंकाळी विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मुर्तवडे-बौद्धवाडीच्या शेतात भातकापणीचे काम सुरू असताना वीज कोसळल्याने सुशील शिवराम पवार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, शेतात काम करणाऱ्या इतर आठ जणांना विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्यांमध्ये उत्तम भिवा पवार (५८), उर्मिला उत्तम पवार ( ५२ ), रोशन रामदास पवार ( १४ ), सुजाता रामदास पवार ( ४० ), संचिता संदीप पवार ( ४५ ), संदीप लक्ष्मण पवार ( ५० ) आणि सुलोचना नारायण कांबळे ( ३७ ) संतोष विठ्ठल कांबळे ( ५५ ) यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुर्तवडे बौद्धवाडीचे रहिवासी आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.