
डोळे दीपवणारी रोषणाई, आकाशात डौलाने झुलणारे आकाश कंदील, जागोजागी काढलेल्या रांगोळ्या आणि फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीमुळे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शुक्रवारी अक्षरशः प्रकाशाचा सोहळाच रंगला. निमित्त होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘दीपोत्सव’ सोहळ्याचे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित शिवाजी पार्क दीपोत्सव 2025चे उद्घाटन संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आजची दिवाळी वेगळी आहे, विशेष आहे. मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या जीवनात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. असेच सर्वजण आनंदात रहा, प्रकाशात रहा आणि सर्वांना आनंद देत रहा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
झळाळती कोटी ज्योती या…
सायंकाळी 7 वाजता ठाकरे कुटुंबीय शिवतीर्थ निवासस्थान येथून छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पोहोचले. ठीक 7 वाजून 15 मिनिटांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रितरीत्या बटणे दाबताच क्षणार्धात संपूर्ण छत्रपती शिवाजी पार्क परिसर रोषणाईने उजळून निघाला. पार्श्वभूमीवर लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… झळाळती कोटी ज्योती या… हे गीत वाजल्याने वातावरण भारून गेले होते.
क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
‘मनसे’च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ‘दीपोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या प्रवेशद्वारावर उभारलेली आकर्षक कमान आणि तोरणांच्या माळा सुरुवातीलाच सोहळ्याच्या भव्यतेची प्रचीती देत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाल्यानंतर अवघा छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला. लख्ख प्रकाशात ठाकरे बंधू सहकुटुंब एकत्र दिसताच टाळ्यांच्या कडकडाटासह एकच जल्लोष झाला आणि अपूर्व आनंदाचा हा क्षण नात्यांचा जणू सणच ठरला. हा सुवर्णक्षण टिपण्यासाठी यावेळी शेकडो कॅमेरे सरसावले.
दीपोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, उपनेता विशाखा राऊत, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पोहोचले. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे त्यांच्यासोबत होते. राज ठाकरे, आई कुंदाताई ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, कन्या उर्वशी, अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य हेसुद्धा उपस्थित होते. दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मराठी एकजुटीचे दर्शन
दीपोत्सवात भगव्या आकाश कंदिलांवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे फोटो आहेत. मराठी एकजुटीचे दर्शन घडविणारे हे कंदील लक्षवेधी ठरले.
सेल्फी घेण्यासाठी चढाओढ
दीपोत्सवानिमित्त केलेल्या रोषणाईसोबत सेल्फी घेण्यासाठी ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आकर्षक रोषणाईसोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडत आहे. 26 ऑक्टोबरपर्यंत हा दीपोत्सव सुरू राहणार आहे.
नेत्रदीपक रोषणाई
मनसेच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवासाठी संपूर्ण पार्कमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. भगवे झेंडे, विविधरंगी तोरणे आणि कंदिलांनी परिसर उजळून गेला आहे. परिसरातील तरुणाई या डोळे दिपवून टाकणाऱ्या कार्यक्रमानिमित्त पारंपरिक वेशात उपस्थित होती. आकर्षक रोषणाई, कलात्मक पद्धतीने लावलेले विविध आकारांचे आकाशकंदील यांच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरला नाही. मनसेच्या वतीने जरी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत असले तरी लक्ष लक्ष दिव्यांनी अंधःकारावर मात करणारा हा सोहळा मुंबईकर आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला नेहमीच आकर्षित करतो.