
>> पराग पोतदार
भारताचा प्रत्येक कोपरा हिरवळीनं भरून जावा हा उद्देश मनात बाळगून जगाला शांतता व हरिततेचा संदेश देणारे `इनोव्हेशन मॅन’ श्याम चौरसिया यांनी पर्यावरणपूरक बॉम्ब तयार केला आहे. बियाण्यांनी युक्त असा हा बॉम्ब जिथे रुजवला जाईल तेथील भूभाग हिरवागार करेल. हरिततेचा आगळा संदेश देणाऱया उपक्रमाविषयी.
‘इनोव्हेशन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे वाराणसीच्या श्याम चौरसियांनी `ग्रीन न्यूक्लिअर बॉम्ब’ बनविला आहे. हा पर्यावरणपूरक बॉम्ब बनवून त्यांनी जगाला शांतता व हरिततेचा संदेश दिला आहे. हा बॉम्ब जिथे पडेल तेथील भूभाग हिरवेगार करेल. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने त्यांनी उचललेले हे ाढांतिकारक पाऊल नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
श्याम चौरसियांना दोन वर्षांच्या कठोर प्रयत्नांनंतर ग्रीन न्यूक्लियर बॉम्ब तयार करण्यात यश मिळाले आहे. पाच फूट लांब आणि 25 किलो वजनाचा हा ग्रीन न्यूक्लिअर बॉम्ब एकाच वेळी अनेक कोटी झाडे उगवेल. यात बी-बियाणं, माती आणि सेंद्रिय खते यांचे मिश्रण आहे, जे जमिनीवर पडल्यावर मोठय़ा भूभागाला हिरवेगार करेल. जे विमानातून ड्रॉप केल्यावर जमिनीवर पडण्यापूर्वी त्यात भरलेल्या शंभराहून अधिक वृक्ष-वनस्पतींच्या प्रजातींच्या एक कोटीहून अधिक बायोन्यूट्रिशन बिया असलेल्या कॅप्सूल्स खूप दूरपर्यंत पसरतील. हवेच्या संपर्कात येताच या बियांच्या कॅप्सूल्सना अंकुरणास मदत होईल. बियांचे विखुरणे नियंत्रित करण्यासाठी हा बॉम्ब इंटरनेटद्वारेही संचालित केला जाऊ शकतो. हा बॉम्ब बनविण्यासाठी श्याम यांना आयटीएम गिडा, गोरखपूरच्या इनोव्हेशन सेलची मदत मिळाली आहे. फायबर व धातूच्या बॉडीचा एक बॉम्ब बनवायला 1.25 लाख रुपये खर्च आला आहे.
32 वर्षीय श्याम चौरसिया यांनी आपलं इंजिनीअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून पर्यावरण रक्षणाचा मार्ग निवडला. बनारसच्या गंगेविषयी आणि निसर्गाविषयी असलेल्या प्रेमातून त्यांना प्रेरणा मिळाली आहे. या कामगिरीमुळे त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
याविषयी श्याम चौरसिया म्हणतात की, सध्याच्या काळात एकमेकांशी लढण्याऐवजी ग्रीन न्यूक्लिअर बॉम्बने पृथ्वीला हिरवेगार करण्यास मदत करणार आहे. माझी इच्छा आहे की, भारताचा प्रत्येक कोपरा हिरवळीनं भरून जावा आणि हा बॉम्ब त्या स्वप्नाचा एक भाग आहे.
त्यांच्या या प्रयत्नांचे उत्तर प्रदेश सरकार आणि पर्यावरण मंत्रालयाकडूनही कौतुक करण्यात आले आहे. त्यांचा हा ग्रीन न्यूक्लिअर बॉम्ब केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक प्रेरणा ठरला आहे.