वेडात मराठे वीर दौडले सात…

प्रतापराव गुजर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती. साल्हेरच्या लढाईत त्यांनी मोठय़ा मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेर येथील मराठय़ांचा विजय हा मुघलांच्या बलाढय़ सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रािढयेतील एक निर्णायक वळण म्हणून पाहिला जातो. प्रतापरावांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला परंतु या पहिल्या लढाईत त्यांचा पराभव झाला. यामुळे महाराजांच्या नाराजीला प्रतापरावांना सामोरे जावे लागले. पुढे नेसरी येथेच दुसरी लढाई झाली. प्रतापरावांनी इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवला. चुकीची भरपाई झाली खरी परंतु या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत सहा वीरांना वीरमरण आले. नेसरीची लढाई या प्रसंगावर कवी कुसुमग्राज लिखित आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरात स्वरबद्ध ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे प्रसिद्ध आहे. इतिहासात अजरामर ठरलेल्या प्रतापरावांचे भव्यदिव्य स्मारक कोल्हापूर जिह्यातील नेसरी (तालुका गडहिंग्लज) येथे उभारण्यात आले आहे. इथे त्यांचा अश्वारुढ पुतळादेखील उभारण्यात आला असून स्मारकाच्या मध्यभागी क्रांतीस्तंभावर प्रतापरावांचा पराक्रम लिहीला आहे.