
सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असतानाच रविवारी रात्री दादर आणि माहीम परिसरात अचानक वीजपुरवठा खंडित झाला. तब्बल दीड तास वीज गायब झाल्याने रहिवाशांचे हाल झाले, तर दुकानदारांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. व्यापाऱयांना अंधारातच कंदील व दिवाळीच्या इतर साहित्याची विक्री करावी लागली. तसेच रहिवाशांना मेणबत्ती पेटवाव्या लागल्या.
रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गायब झाली. दादर परिसरात खरेदीसाठी शहराच्या इतर भागांतून आलेल्या नागरिकांची गर्दी झाली होती. याचदरम्यान वीज गायब झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले. माहीम येथील कंदील गल्ली रोड परिसरातकंदील खरेदी करण्यासाठी गर्दी होते. येथेही व्यवसायावर मोठा परिणाम झाला. वीजपुरवठा वेळीच सुरू न केल्याने सरकारविरोधात रहिवाशांनी संताप व्यक्त केला.