
हिंदुस्थानी महिला संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागल्याने वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान संघाची सेमीफायनलची वाट आता कठीण झाली आहे. हरमनप्रीत काwरच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेला दमदार सुरुवात केली होती आणि पहिले दोन सामने जिंकले होते. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंडकडून झालेल्या पराभवांमुळे संघाची स्थिती बिकट झाली आहे. तरीही हिंदुस्थानी संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असून, अंतिम चारमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत आहे.
हिंदुस्थान अन् न्यूझीलंडमध्ये रस्सीखेच
हिंदुस्थानचा पुढील सामना गुरुवारी न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने आधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला असून, चौथ्या स्थानासाठी हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात रस्सीखेच असेल. न्यूझीलंडचा नेट रनरेट सध्या निगेटिव्ह आहे, तर हिंदुस्थानचा प्लस आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने जिंपून हिंदुस्थानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल. सध्या हिंदुस्थान आणि न्यूझीलंड दोघांचे चार गुण आहेत. मात्र, न्यूझीलंडने फक्त एकच सामना जिंकला असून, त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानकडे प्रत्येकी दोन गुण आहेत आणि या तीन संघांची सेमीफायनलची आशा जवळपास संपली आहे.
हिंदुस्थानचा स्पर्धेतील प्रवास
हिंदुस्थानने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आणि त्यानंतर चिरप्रतिद्वंद्वी पाकिस्तानवर विजय मिळवला. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून संघाला पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांतून ‘टीम इंडिया’ने दोन विजय आणि तीन पराभव नोंदवले असून, संघाच्या खात्यात चार गुण आहेत. हिंदुस्थानचा नेट रनरेट औ0.526 असा सकारात्मक आहे. हिंदुस्थानला आता न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवायचा असल्यास हे दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे हिंदुस्थानसाठी आता उर्वरित दोन लढती ‘करो या मरो’ ठरणार आहेत.
ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम
गतविजेता ऑस्ट्रेलिया सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी पाच सामने खेळले असून, चार विजय आणि एक रद्द सामन्यासह नऊ गुण मिळवले आहेत. इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी पाचपैकी चार सामने जिंकले असून, त्यांचाही एक सामना पावसात वाहून गेला. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. या संघाने पाचपैकी चार विजय मिळवले आहेत आणि एक पराभव पत्करला आहे. त्यामुळे तीन सेमीफायनलिस्ट निश्चित झाले असून, आता शेवटच्या स्थानासाठी हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात खरी झुंज रंगणार आहे. उर्वरित संघांचे विश्वचषकातील स्वप्न गटफेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.