एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबचा 310 धावांचा डोंगर

एमसीए 29 वी अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत चौथ्या फेरीत एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबने माटुंगा जिमखाना संघाविरुद्ध 310 धावांच्या डोंगर रचला.

न्यू इरा आझाद मैदान येथे सुरू असलेल्या दोनदिवसीय सामन्यात माटुंगा जिमखाना संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबने 80.1 षटके खेळून काढताना 310 धावा केल्या. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. अर्शियान शेखने 65 चेंडूंत सर्वाधिक 59 धावा केल्या. त्यात त्याने 10 चौकार लगावले. अब्दुर रहमान खान 56 धावा (109 चेंडू , 7 चौकार) व गोलू पालने 57 धावा (74 चेंडू, 8 चौकार) करत त्याला चांगली साथ दिली. पीयूष कुमार 42 आणि लविश सिंगने 36 करताना संघाचा तीनशेपार नेण्यात मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, यजमान वरळी स्पोर्ट्स क्लबची व्हिक्टरी सीसीविरुद्ध पराभवाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वरळी एससी संघाचा डाव 52.1 षटकांत 107 धावांत आटोपला. वरळी एससी संघाकडून चंद्रकिसन बिंदने सर्वाधिक 42 धावा केल्या. व्हिक्टरी सीसीच्या गोलंदाज आयुष गोहो (33 धावांत 4 विकेट) आणि तनय महासरियाने (17 धावांत 4 विकेट) अचूक मारा करताना वरळी एससीला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखले. प्रत्युत्तरादाखल पहिल्या दिवसअखेर व्हिक्टरी सीसीने 8 षटकांत 1 बाद 39 धावा केल्या.