
हिंदुस्थान S-400 हवाई संरक्षण यंत्रणेसाठी रशियाकडून १० हजार कोटी रुपयांचे क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी करार करणार आहे. यासाठी रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या २३ ऑक्टोबरच्या बैठकीत याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
ही प्रगतिशील हवाई संरक्षण यंत्रणा हिंदुस्थानच्या हवाई सुरक्षेसाठी गेम-चेंजर ठरली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान S-400 हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी लढाऊ विमानांना धडक देऊन त्यांना पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय हिंदुस्थान आणखी S-400 सिस्टीम आणि प्रगत S-500 सिस्टीम खरेदी करण्यावर विचार करत आहे.
S-400 ट्रायम्फ ही रशियाची २००७ मध्ये लॉन्च झालेली प्रगतक्षेपणास्त्रे यंत्रणा आहे. ती लढाऊ विमाने, बॅलिस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्रे , ड्रोन्स आणि स्टेल्थ विमाने अशा विविध हवाई धोक्यांविरुद्ध मजबूत ढाल म्हणून काम करते. जगातील सर्वात आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणांपैकी एक असलेल्या या सिस्टीमने हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण धोरणात क्रांती घडवली आहे.



























































