राज्यपालांचा खाजगी एलिफंटा दौरा; उद्या गेटवे-मांडवा, गेटवे -एलिफंटा दरम्यान सागरी वाहतूक बंद

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत शुक्रवारी (२३) एलिफंटा बेटाला भेट देणार आहेत. राज्यपालाच्या या खासगी दिड ते दोन तासांच्या दौऱ्यासाठी सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून मुंबई गेटवे सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या सागरी नाकाबंदीमुळे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, मांडवा-अलिबाग दरम्यानची सागरी प्रवासी, पर्यटक वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने ऐन दिवाळीच्या सणातच शेकडो व्यावसायिकांना व्यवसायाला मुकावे लागणार आहे.

जगप्रसिद्ध एलिफंटा बेटाला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत भेट देणार आहेत.या दौऱ्या दरम्यान मुंबई गेटवे सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून एलिफंटा, अलिबाग -मांडवा या सागरी मार्गावरुन दररोज हजारो प्रवासी, पर्यटकांची वाहतूक केली जाते.या प्रवासी, पर्यटक आधारावर अनेक व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.मात्र राज्यपालांच्या दौऱ्या दरम्यानच्या या सागरी नाकाबंदीमुळे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, मांडवा-अलिबाग दरम्यानची सागरी प्रवासी,पर्यटक वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांना व्यवसायाला मुकावे लागणार आहे.

याआधीही ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील दोन दिवसांच्या आयोजित दौऱ्याच्या सुरक्षिततेसाठी मुंबई गेटवे सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक पुर्णता बंद करून सागरी नाकाबंदी करण्यात आली होती.