भाऊबीज म्हणजे यम द्वितीया; जाणून घ्या पौराणिक महत्त्व…

भाऊबीज ज्याला यम द्वितीया म्हणूनही ओळखले जाते. हा सण दिवाळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणींमधील प्रेम, त्याग आणि भक्तीचे प्रतीक आहे. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. ऋग्वेद आणि पुराणांमध्ये या सणाचा उल्लेख आहे. त्यामुळे तो दिवाळीचा सर्वात प्राचीन सण असल्याचे मानले जाते. भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात आणि यामागील पौराणिक कथा जाणून घेऊ या.

हा भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, त्याग आणि भक्तीचा सण आहे. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. तर बहिण आपल्या भावांना आमंत्रित करतात, त्यांना ओवाळतात आणि शुभेच्छा देतात आणि त्यांना जेवू घालतात. यम द्वितीया किंवा भाऊबीज सणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील दहाव्या मंडळाच्या संवद सूक्तात या घटनेचे वर्णन केले आहे. या संवाद सूक्तात यम आणि त्याची बहीण यमुना (यमी) यांच्यातील संभाषण नोंदवले आहे. संवाद सूक्त भारतीय व्यवस्थेतील कुटुंबाच्या मूल्यांवर आणि आदर्शांवर प्रकाश टाकते आणि प्रत्येक नात्याची मर्यादा देखील अधोरेखित करते.

यम आणि यमीची कथा विष्णू पुराण, कूर्म पुराण आणि मार्कंडेय पुराणात विविध संदर्भांसह सांगितली आहे. विष्णू पुराणानुसार, यम एके दिवशी त्याची बहीण यमीच्या घरी पोहोचला. यम म्हणजे मृत्यूची देवता, त्यामुळे यम म्हटले की सर्वांनाच धास्ती असते. मात्र, यमी तिच्या भावाला पाहून खूप आनंदी झाली. यमीने यमाला मोठ्या आदराने बसवले, स्वादिष्ट पक्वान्न तयार केले आणि त्याला जेवू घातले. पहिल्यांदाच अशा प्रकारचे आदरातिथ्य पाहून यमाला खूप आनंद झाला आणि त्याने यमीला वरदान मागण्यास सांगितले. यमीने स्वतःसाठी काहीही मागितले नाही, उलट असे म्हटले की ज्या बहिणी या दिवशी आपल्या भावाला आनंदाने जेवू घाततील त्यांच्यावर कृपा ठेव. त्या घरात अकाल मृत्यूचे भय नसावे. त्यावर या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी जाईल. तिचा सन्मान करेल आणि तिची काळजी घेतली त्याला कधीही अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही, असा आशिर्वाद यमाने दिला, अशा प्रकारे भाऊबीजेची प्रथा रुढ झाली असे सांगण्यात येते.