
गायक मोहम्मद रफी, कुमार सानू यांची मनाला भावणारी सुमधुर गाणी, रसिकांना नाचायला लावणारी कोळीगीते अशा मराठी, हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने प्रेक्षक भारावून गेले निमित्त होते ते शैलेंद्र स्वर दीपावली कार्यक्रमाचे. दहिसर येथे पार पडलेल्या सुरेल गाण्याच्या कार्यक्रमात रसिकांनी तुफान गर्दी करत एकच जल्लोष केला.
सुरश्री संगीत प्रशिक्षण केंद्र गोरेगावचे संचालक अनिल देसाई, संचालिका शुभांगी देसाई यांच्यातर्फे दहिसर येथील शैलेंद्र एज्युकेशन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शैलेंद्र स्वरदीपावली हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थेचे कार्याध्यक्ष रजनीकांत प्रभू, सचिव आशीष गिरप, कोषाध्यक्ष प्रसाद वालावलकर, संजय बिरवडकर, भालचंद्र राईलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात पार्श्वगायक श्रीकांत नारायण यांनी मोहम्मद रफी, बालसुब्रमण्यम तसेच कोळीगीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कुमार सानू यांच्या आवाजातील गाणी गाणारे पी. गणेश यांनी सादर करत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली, मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फायनलिस्ट जुई चव्हाण, गायिका कोमल तेंडुलकर, जयंत पिंगुळकर, स्वरुप भालवणकर, डॉ. हिमांशु, कांचन जाधव, वरुण बिडये, इम्रान अली तसेच सुरश्रीच्या संचालिका शुभांगी देसाई व अनिल देसाई यांनी सुरेल गाणी सादर करत रसिकांची वाहवा मिळवली.


























































