
मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाची बॅटिंग सुरू आहे. रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा परिसरापासून अगदी चेंबूर, मुलुंड, दहिसरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. घराच्या वाटेवर असलेले मुंबईकर छत्री जवळ नसल्यामुळे ठिकठिकाणी खोळंबले. काही भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली. त्यातच लोकल ट्रेनही विलंबाने धावल्या. अवघ्या तीन तासांत कुलाब्यात 14.6 मिमी तर सांताक्रुझमध्ये 6.6 मिमी पावसाची नोंद झाली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत जाणवत आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह कायम असतानाच परतीच्या पावसाने अधूनमधून हजेरी सुरू ठेवली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी नातेवाईकांच्या घरी जाण्याचा बेत अनेकांनी आखला. त्यांच्या आनंदावर सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसाने पाणी फेरले. सायंकाळी 5 नंतर दक्षिण आणि मध्य मुंबईत पावसाचा जोर अचानक वाढला. पर्ह्ट, चर्चगेट, लालबाग, परळ, वरळी, मरिन लाईन्स, पवई, विक्रोळी, अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, मानखुर्द, घाटकोपर, चेंबूर परिसरात पावसाच्या ‘जोर’धारांनी मुंबईकरांना झोडपले. जवळपास दोन तास पावसाची जोरदार बरसात सुरू होती. त्याचा रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
उपनगरांतील अनेक रस्त्यांवर विद्युतवाहिनी आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी खोदकाम केले आहे. रविवारच्या पावसामुळे त्या भागात पाणी साचले आणि संबंधित कामे ठप्प पडली. अंतर्गत रस्त्यांबरोबरच पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला. उपनगरांत महामार्गावर जागोजागी वाहतूककाsंडी झाली. त्यामुळे वाहनधारकांची रस्ते प्रवासातच दोन ते तीन तास रखडपट्टी झाली.
व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाऊबीज सणानिमित्त अनेक लोक अजूनही खरेदी करीत आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीचे पर्व कायम असताना रविवारच्या सुट्टीत कोसळलेल्या पावसाने व्यापाऱयांच्या पदरी निराशा पडली. पावसामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची संख्या कमी झाली. रस्त्यांलगत व्यवसाय करणाऱया छोटय़ा व्यापाऱयांना मोठा फटका बसला. फटाके भिजल्याने फटाके विव्रेत्यांचे नुकसान झाले.
मध्य रेल्वेच्या लोकल प्रवासात खोळंबा
मध्य रेल्वेने दिवाळीच्या सुट्टीतही मेगाब्लॉक ठेवला होता. त्यासाठी अनेक लोकल फेऱया रद्द केल्या होत्या. त्यातच सायंकाळी मुसळधार पावसाची हजेरी लागल्याने लोकल सेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन 20 ते 25 मिनिटे उशिर ाने धावल्याने प्रवाशांचा लोकल प्रवासातच बराच वेळ खोळंबा झाला.

























































