देशातील १२ राज्यांमध्ये सुरु होणार SIR चा दुसरा टप्पा, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

देशातील १२ राज्यांमध्ये ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’चा (SIR) दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’चा (SIR) दुसरा टप्पा १२ राज्यांमध्ये सुरू होत आहे. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करणे, नवीन मतदार जोडणे आणि चुका दुरुस्त करणे यांचा समावेश असेल.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’च्या (SIR) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात जाहीर करण्यासाठी आलो आहोत. मी बिहारच्या मतदारांना माझ्या शुभेच्छा देतो आणि या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी झालेल्या आणि ती यशस्वी करणाऱ्या 7.5 कोटी मतदारांचे आभार मानतो.”

ते म्हणाले की, “आयोगाने देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रक्रियेवर सविस्तर चर्चा केली.” आतापर्यंत १९५१ ते २००४ दरम्यान देशात आठ वेळा एसआयआर प्रक्रिया घेण्यात आली आहे.

या १२ राज्यांमध्ये राबवली जाणार SIR प्रक्रिया

  • अंदमान आणि निकोबार
  • छत्तीसगड
  • गोवा
  • गुजरात
  • केरळ
  • लक्षद्वीप
  • मध्य प्रदेश
  • पुद्दुचेरी
  • राजस्थान
  • तामिळनाडू
  • उत्तर प्रदेश
  • पश्चिम बंगाल