
मतदान केंद्रावर मतदाराला चेहऱ्यानिशी ओळखणाराच आपला पोलिंग एजंट असला पाहिजे, असे नमूद करतानाच मतदाना वेळी जर काही गडबड दिसली. मतदार बोगस आहे याची खात्री पटली तर त्याला बेलाशक थोबडवा….त्याला बिनधास्त फटकवा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले. आपण वारंवार सांगूनही निवडणूक आयोग त्याला दाद देणार नसेल तर मग लोकशाहीने दिलेला अधिकार आम्ही बजावणार. काही वाट्टेल ते होऊ द्या बोगस मतदाराला मतदान करू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
वरळीतील एनएससीआय डोम येथे विभागप्रमुख ते उपशाखाप्रमुखांपर्यंत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्याला संपूर्ण डोम गर्दीने खच्चून भरला होता. या गर्दीच्या साक्षीने मुंबई जिंकणारच…महापालिकेवर भगवा फडकविणारच! असा एकमुखी संकल्प करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ शोधून काढण्याच्या सूचना देतानाच भारतीय जनता पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज मुंबई दौऱयावर आलेले पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा खरपूस समाचार घेतला.
मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे, आज त्यातील एक जण येऊन गेला असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत अमित शहांवर निशाणा साधला. जिजामाता उद्यानात अॅनाकोंडा येणार अशी ती बातमी होती. त्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेना सत्तेवर असताना पेंग्विन आणले म्हणून काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक शिवसेनेवर टीका करतात. ते सोडा. अॅनाकाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप, तो येऊन गेला, त्यांना मुंबई गिळायचीय, पण ते मुंबई कशी गिळतात ते बघतोच, नाही पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही’, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
भाजपवाल्यांची ब्रह्मचाऱ्याची पिलावळ आहे तशी ठाकरेंची घराणेशाही नाही
अमित शहा यांनी मुंबई भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना घराणेशाहीवर वक्तव्य केले. त्याला या वेळी उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘‘मुंबईत भूमिपूजन करायला आलात तर डोक्यावर नारळ फोडा नाहीतर दगडावर एकच आहे, पण ते करतानासुद्धा घराणेशाहीवर बोलता. अमित शहांच्या व्रेडिटनेच त्यांचे कार्टे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले, मग घराणेशाही कुणाची?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ठाकरेंच्या घराणेशाहीच्या समोर उभे राहून दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले. ‘‘आम्ही आमच्या आई-वडिलांचे ऋण मानणाऱ्या घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. भाजपवाल्यांची ब्रह्मचाऱ्याची पिलावळ आहे तशी ठाकरेंची घराणेशाही नाही. एकेका ब्रह्मचाऱ्याला चाळीस-चाळीस पोरं, झाली कशी? ब्रह्मचाऱ्याला चाळीस पोरं होत असतील तर मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला आणि तीच परिस्थिती भाजपची झाली आहे. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं,’’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांची टीका परतावून लावली.
सरकार आल्यावर निवडणूक आयुक्तांवर खटला भरणार
ईव्हीएम मशिनमध्ये गडबड होते हा शिवसेनेचा संशय अजूनही कायम आहे याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला करून दिली. महापालिकेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाही असे आयोग म्हणतो मग निवडणूक कशाची घेणार? बोगस मतदार मतदान करून निघून जाणार? तुम्हाला वाटेल तसे तुम्ही निर्णय देणार? आणि आम्ही काही केले तर करप्ट प्रॅक्टीस म्हणून आमच्यावर कायद्याचा बडगा उगारणार? अशी प्रश्नांची सरबत्तीच उद्धव ठाकरे यांनी केली. असे असेल तर मग निवडणूक आयुक्तांवरही केस केली पाहिजे. त्यांनाही सजा झाली पाहिजे, कायद्यासमोर सर्व सारखे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आत्ता भाजपचे दिवस असतील चोरून घेतलेले, पण उद्याचे दिवस आमचे असणार आहेत, आमचे सरकार आले तर निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करून न्यायालयासमोर उभे करू, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही
सर्व ओरबाडून खायचेय, विरोधकांना संपवून टाकायचेय म्हणून भाजपला निवडणूक आयोगाच्या सहकार्याने सत्ता आणायची आहे. हुकूमशाही येऊ द्यायची नसेल तर विरोधाची हीच वेळ आहे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले. पण मतदार यादयांमधील चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणूक घेता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.
भाजप म्हणजे स्वयंघोषित देशभक्तांची बोगस टोळी
भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष, कसला? भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशभक्तांची ही बोगस टोळी आहे, स्वतःच स्वतःला देशप्रेमी म्हणून जाहीर करायचे आणि बोगस देश प्रेम दाखवायचे, असे टीकास्त्रही उद्धव ठाकरे यांनी सोडले. आत्मनिर्भर भारत करणार असे भाजपा सांगते. पण अजूनही भाजप आत्मनिर्भर होत नाही. त्यांना लोक चोरावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, पक्ष फो़डावे लागतात, मते चोरावी लागतात आणि म्हणे की आत्मनिर्भर? हे कसले आत्मनिर्भर? पुचाट लेकाचे, अशी सणसणीत चपराकही उद्धव ठाकरे यांनी लगावली.
…म्हणून पैसे देऊन मुंबई ताब्यात घेण्याचा डाव
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मराठी माणसांना गोळ्या घालण्याचा आदेश देणारे मोरारजी देसाई हेसुद्धा गुजरातीच होते. आता गोळ्या घालून मराठी माणूस झुकत नाही, म्हणून पैसे देऊन मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. अशा पिलावळीला शिवसेनेने का वाढवले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. चहावाला पंतप्रधान झाला, पण त्याला पाठिंबा दिला होता. पण चहावर जीएसटी लावणारा हा कसला पंतप्रधान आहे, अशी टीका त्यांनी मोदी यांच्यावर केली.
एखादा फुलबाजा भाजपवाल्यांच्या बुडाला लावला असता
मनसेच्या दिपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी तिथे मराठी माणसांबरोबरच अमराठीही होते. दिपोत्सवाच्या प्रकाशात त्या सर्वांचा आनंद उजळून निघाला होता. त्यावरून भाजपने टीका केली होती. आधी कळले असते तर त्यातलाच एखादा फुलबाजा भाजपवाल्यांच्या बुडाला लावला असता, असा मिश्कील टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मोदींना गोमांसाचा वास येत नाही का?
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले होते की, मी गोमांस खातो आणि आजही ते मोदींच्या मंत्रिमंडळात बसतात. तरीही मोदीना त्यांचा गोमांसाचा वास येत नाही. मोदींचे हिंदुत्व बेगडी आहे, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. भाजप नेत्यांनीच गोमांसाचे समर्थन केल्याच्या वक्तव्याची उदाहरणेही त्यांनी दिली. मेघालयच्या भाजप प्रमुखांनीही गोमांसाचे समर्थन केले होते आणि त्रिपुरात असताना भाजप नेते सुनील देवधर म्हणाले होते की, हिंदूही बीफ खातात, त्यामुळे त्याच्यावर बंदी घालू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नवीन येणारी माणसे म्हणजे सावजी चिकन
भाजपने मुंबईत चौपाटीजवळ नवीन कार्यालयाचे भूमीपूजन केले. आता कार्यालयाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही बोलवावे. नवीन येणारी माणसे म्हणजे सावजी चिकन असे गडकरी म्हणाले होते. भाजपमध्ये निष्ठावंतांना केवळ सतरंज्या उचलाव्या लागतात. नव्या कार्यालयामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्यासाठी नवी जागा मिळाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपले विश्वगुरु बुरखाधारी
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हिंदुस्थानला ब्रह्मोस आणि संरक्षणमंत्र्यांचीही गरज नाही. केवळ अमित शहांच्या मुलाने मुलाला पाकिस्तानविरुद्ध सामना रद्द करायची गरज होती. आमचे विश्वगुरु घालीन लोटांगण वंदिन चरणम करणारे हे बुरखाधारी लोक पाकिस्तानविरुद्ध सामना खेळतात, असे टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
1 नोव्हेंबरच्या मोर्चात पूर्ण ताकदीनिशी या
1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काढण्यात येणाऱया सर्वपक्षीय मोर्चात पूर्ण ताकदीनिशी सहभागी व्हा. ऊन,वारा, पाऊस काहीही असो, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी हा मोर्चा विराट झालाच पाहिजे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.
यावेळी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, माजी खासदार अनंत गिते, विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, माजी खासदार राजन विचारे उपस्थित होते. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले.
पूरग्रस्तांना मदत
वरळी विभागातील शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांच्या हस्ते यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. वरळी विभागाने यावेळी पूरग्रस्तांसाठी 55 हजार 555 रुपयांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
भाजपचे कार्यालय उभे राहतेय, मराठी भाषा भवन का रखडलेय?
मरीन लाईन्सला भाजपचे टोलेजंग कार्यालय उभारले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची जागा अवघ्या 11 दिवसांत भाजपच्या पदरात टाकली गेली. त्यासंदर्भात दैनिक सामनामध्ये प्रकाशित वृत्ताचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर शरसंधान केले. भाजप म्हणते स्वतःच्या पैशाने ते कार्यालय उभारतोय. कारण भाजपकडे देणग्यांचे, इलेक्टोरल बॉन्डचे खूप पैसे आहेत. पण ज्या पध्दतीने घाईघाईने ती जमीन ताब्यात घेऊन त्यावर इमले बांधताय त्यावर शिवसेनेचा आक्षेप आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपच्या कार्यालयासाठी इतक्या घाईघाईत प्रक्रिया पूर्ण केली मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेले मराठी भाषा भवन अजून का रखडलेय. मराठी रंगभूमीचे दालन का रद्द करण्यात आले, असेही उद्धव ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. अदानीला एलआयसीचे 30 हजार कोटी रुपये देता मग कार्यालयाची इमारत उभी करताय त्यात कौतुक कसले, असेही ते म्हणाले.
उपशाखाप्रमुखांनी आजपासून काय करायचे?
एका मतदार यादीत साधारणपणे 1200 नावे आहेत. चार ते पाच जणांचे एक कुटुंब धरले तर 300 घरे होतील. उपशाखाप्रमुखांनी आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन या 300 घरांमध्ये जाऊन मतदार यादीचे वाचन करायचे. नाव, चेहरे, पत्ते योग्य आहेत का तपासायचे. उपशाखाप्रमुखांनी रोज दोन ते तीन गटप्रमुखांना भेटायचे. शाखाप्रमुखांनी उपशाखाप्रमुखांना, उपविभागप्रमुखांनी शाखाप्रमुखांना तर विभागप्रमुखांनी उपविभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांना रोज भेटून किती याद्या तपासल्या, किती बोगस मतदार सापडले याबाबतची माहिती द्यायची, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
डोकी फुटतील, पण भगवा फुटणार नाही!
आज मुंबईत येऊन गेलात, आता निवडणुकीनंतर याल तेव्हा मुंबई शिवसेनेच्या भगव्या रंगाने भगवी झालेली दिसेल, असे जाहीर आव्हान या वेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना दिले. कितीही प्रयत्न करायचे ते करा, कितीही डोकं आपटा, डोकी फुटतील, पण भगवा फुटणार नाही. शिवरायांच्या मावळ्याला कुणी डिवचायचे नाही. डिवचले तर प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिला आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसेना तयार आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी मुंबई पालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार, असा ठाम विश्वास या वेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
लोकशाहीत मतदार सरकार निवडतात; पण आताची परिस्थिती अशी आहे की, सरकार मतदार निवडायला लागलं आहे. सरकारच ठरवणार कुणी मतदान करायचं आणि कुणी नाही करायचं. याला उडवा, त्याला उडवा, वरती कुणाचातरी कुणी गेलाय त्याला सर्वपित्री म्हणून खाली आणा. असेच सगळे प्रकार सध्या चाललेले आहेत.
चेहऱयानिशी मतदाराला ओळखणारा पोलिंग एजंट नेमा
निवडणुकीच्या दिवशी शिवसेनेच्या प्रत्येक पोलिंग एजंटकडे मतदार यादी पह्टोनिशी असावी. नुसता मतदार यादीतला फोटो नाही तर चेहऱ्यानिशी मतदाराला ओळखेल असाच पोलिंग एजंट असला पाहिजे, यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी भर दिला.





























































