
वरळीच्या एनएससीआय डोममध्ये आज झालेला शिवसेनेचा निर्धार मेळावा निवडणूक आयोग व सत्ताधाऱयांना जोरदार हादरा देणारा ठरला. या मेळाव्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीतील मतचोरीचे ‘ए टू झेड’ पुराव्यांसह पावरफुल्ल प्रेझेंटेशन केले. सलग 25 मिनिटे मुद्देसूद मांडणी करताना आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या 19 हजारांहून अधिक मतांच्या फ्रॉडचा पर्दाफाश केला. आदित्य ठाकरे यांनी चव्हाटय़ावर आणलेल्या या महाभयंकर गडबडघोटाळ्याची देशभरात चर्चा आहे.
निवडणूक आयोग सध्या भाजपचं काम करतोय. मग त्यांचं काम कोण करणार? ते आता आपण करायचं. आपल्याला ती जबाबदारी पार पाडावी लागेल!
‘बोगस सरकारचे बोगस मतदार’ अशा शीर्षकाखाली आदित्य ठाकरे यांनी सादरीकरण केले. ते करताना त्यांनी स्वतःच्या वरळी मतदारसंघातील मतदार यादीतील गडबडीचे दाखले दिले. नाव, पह्टो, पत्ते, आडनावे, लिंग यात घोळ असलेल्या मतदारांपासून ते मराठी वडील असलेल्या अमराठी मतदारांची कुंडलीच आदित्य ठाकरे यांनी यावेळी मांडली. हा घोटाळा समोर आणतानाच, आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना जबरदस्त आवाहन केले. ’या पुढची लढाई केवळ प्रचार, बॅनर, सभा आणि मोर्चातून होणार नाही, मतांची चोरी पकडून लढावी लागेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मतदार यादी हाती आल्यावर ही लढाई सुरू होईल. मुंबईला ’अदानीस्थान’ होण्यापासून वाचवण्यासाठी ती लढावी लागेल, त्यासाठी तयार राहा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मृत मतदार पुन्हा जिवंत झाला!
नरहरी कुलकर्णी यांचे नाव 96 क्रमांकाच्या मतदार यादीत होते. ते मृत झाल्यामुळे लोकसभेच्या वेळी त्यांचे नाव यादीतून वगळले. मात्र विधानसभेला त्या व्यक्तीने त्याच नावाने पुनर्जन्म घेतला आणि मतदान केले. त्यासाठी त्यांचा मतदार यादी क्रमांक व इपिक नंबर बदलून त्यांची पुन्हा नोंदणी करण्यात आल्याचे आढळून आले.
फोटोंचा फर्जीवाडा
मतदार कार्डवरील फोटोंचा फर्जीवाडा देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी समोर आणला. युरोनेट नावाचे एक सॉफ्टवेअर आहे. ज्याचे नाव आता ईसीनेट केले आहे. हे सॉफ्टवेअर फक्त निवडणूक आयोगाकडे आहे. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोटोची सत्यता तपासली जाऊ शकते. मात्र मतदार कार्डवर अनेक फोटो इतके भुरकट, छोटे आणि जुने फोटों असतात की चेहरा पाहून मतदाराची पडताळणी करणे जवळपास अशक्य असते. एका फोटोत फक्त नाकच आहे. काही मतदार कार्डवर फोटोच नाहीत. पोलिंग एजंट अशा मतदारांना कसे ओळखणार? वरळीच्या मतदार यादीतील फोटोंच्या घोळाचा आकडा काढल्यास तो 22 ते 23 हजारांपर्यंत जाऊ शकतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
घसीटाराम हलवाईच्या दुकानात 48 मतदार
घसीटाराम हलवाईच्या दुकानात 48 मतदार राहत असल्याचे निवडणूक आयोगाने दाखवले. दुकानावर रहिवाशी म्हणून नोंद करता येत नाही. त्या पत्त्यावर मतदानाचा हक्क मिळत नाही. आम्ही माहिती काढली असता ते दुकानच तिथे नाही. दहा वर्षांपूर्वीच ते तोडले गेले आहे. तिथे एकही व्यक्ती राहत नसल्याचे आम्हाला आढळले.
एका घरात 38 मतदार
आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोरिचा मार्ग येथील एका घराचा व्हिडिओ दाखवला. अत्यंत छोटया असलेल्या या घरात 38 लोक राहत असल्याचे मतदार यादीत आढळून आले. प्रत्यक्षात पाहणी केली असता तिथे एकही मतदार राहत असलेला आढळला नाही. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत अशा प्रकारची 214 घरे आहेत, जिथे 3335 मतदार राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
एक मतदार कार्ड तीन भाषा
वरळीच्या मतदार यादीत काही मतदान ओळखपत्रे मराठी, इंग्रजी, कन्नड किंवा तेलुगु अशा विविध भाषांमध्ये आढळली. महाविकास आघाडीचे सगळे नेते निवडणूक आयोगाकडे गेलो होतो, तेव्हा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर, सीमावर्ती भाग असेल तर कार्ड इकडचे तिकडे होऊ शकतात असे आम्हाला सांगण्यात आले. वरळीची बॉर्डर नेमकी कोणाशी जोडलेली आहे? इथून 12 नॉटिकल मैल गेलं तर आंतरराष्ट्रीय सीमा लागेल. मग आफ्रिकेच्या एखाद्या देशाची सीमा लागते का हे पाहावं लागेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला.
- एक मतदार 1995 साली वारले होते. तेव्हा मी 5 वर्षांचा होतो. आता 35 व्या वर्षी निवडणूक लढवत असताना यादीत आले आहेत. अशी यादी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात आणून मतदान करून घेतले आहे. यांच्या नावावर किती लोकांनी मतदान केले असेल हे सांगता येत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मतदारांचे लिंग बदलले!
महिला मतदारांचे लिंग पुरुष असे नमूद करण्यात आले आहे. उदाहरण म्हणून आदित्य ठाकरे यांनी गौरी गगन गुप्ता आणि तेजश्री दिलीप हडकर यांचे मतदार कार्ड दाखवले. लिंगाचा घोळ असलेले असे 643 मतदार आढळून आले आहेत.
मतदार आणि वडिलांचे एकच नाव
वरळीतील अनेक याद्यांमध्ये मतदाराचे आणि त्याच्या वडिलांचे नाव एकसारखेच आहे. असे एकूण 502 मतदार वरळी मतदारसंघात सापडले आहेत.
आता पुढे काय करायचं?
वरळीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर 1200 मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत, अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली. एका मतदारसंघात इतकी गडबड असेल तर संपूर्ण मुंबईत असे लाखो मतदार चुकीच्या पद्धतीने घुसवलेले असतील किंवा वगळले असतील. त्यामुळे आपल्याला पक्का होमवर्क करावा लागेल. प्रत्येक शाखेने 1200 मतदारांची यादी काढावी व फोटो, नाव, ईपिक नंबर, पत्ता, मृत मतदार अशा पाच महत्त्वाच्या निकषांवर पडताळून पाहावी. वगळलेल्या नावांमध्ये आपले कार्यकर्ते, मित्र-मंडळी कोण आहेत, एकाच पत्त्यावर 10 पेक्षा अधिक मतदार आहेत का हे सगळे प्रत्यक्ष जाऊन पाहावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
ईपिक नंबरचा भयंकर घोळ
मतदान ओळखपत्रावर ईपिक नंबर अनिवार्य असतो. कारण तो प्रत्येकाचा स्वतंत्र असतो. मात्र वरळीतील यादीत ईपिक नंबर नसलेली नावंही घुसवण्यात आली आहेत. असे 28 मतदार सापडले. तर, एकाच ईपिक नंबरवर अनेक वेगवेगळी नावे असलेले 133 मतदार सापडले. यापेक्षा भयानक म्हणजे वेगवेगळ्या ईपिक नंबरवर एकसारखी नावे असलेले मतदारही सापडले. वरळीत 3586 मतदान ओळखपत्रावर 7810 वेगवेगळे ईपिक नंबर सापडले. या ओळखपत्रावरील नावात किंचित बदल करण्यात आला आहे. असे करून अनेकांनी दुबार मतदान केले असण्याची शक्यता आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
चांगलं जगायचं असेल तर वरळीत या!
85 पेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरून मतदान करता येते, त्यांना वेगळ्या सुविधा असतात. त्यामुळे असे मतदार मतदारसंघात किती आहेत याचा आपल्याला साधारण अंदाज असतो. आयोगाच्या यादीनुसार वरळीत शंभरी ओलांडलेले 113 मतदार आहेत. हे कळल्यावर मला आनंद झाला. आपला मतदारसंघ फिट इंडियामध्ये बसतो. पुढच्या निवडणुकीसाठी ही माझी जाहिरात होऊ शकते. चांगले जगायचे असेल, 100 पेक्षा जास्त वर्षे जगायचे असेल तर वरळीत या, असे मी सांगू शकतो, असे आदित्य ठाकरे म्हणताच हशा पिकला. चौकशी केल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली. यातले अनेक मतदार काही वर्षांपूर्वीच वारले आहेत, असे ते म्हणाले.
चार महिन्यांत काय घडले?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरळीत 2,52,970 मतदार होते. विधानसभेला ती संख्या 2,63,352 वर गेली. यात 16,043 मतदारांची वाढ झाली आणि 5661 मतदारांची नावे कमी झाली. म्हणजे साधारण साडेदहा हजारांची वाढ झाली. या वाढीचा आणि कमी झालेल्या मतदारांचा अभ्यास करताना प्रत्यक्षात 19,333 मतदारांचा घोळ समोर आला.
भानजी पटेलांचा मुलगा गिरीश म्हात्रे
काही याद्यांमध्ये मतदाराचे आडनाव मराठी आणि वडिलांचे अमराठी, तर काही ठिकाणी मतदाराचे आडनाव अमराठी आणि वडिलांचे आडनाव मराठी असे प्रकार आहेत. गिरीश म्हात्रे यांच्या वडिलांचे नाव भानजी पटेल आहे. तर संतोष सरोज यांच्या वडिलांचे नाव राधेश्याम राधेश्याम आहे. आडनावांचे घोळ असलेले तब्बल 720 मतदार आढळले.
घर क्रमांक – ‘झो’ आणि ?/???
वरळी मतदारसंघात 67 मतदारांच्या घरांचे क्रमांक ‘झो’ असा आहे. हा ‘झो’ म्हणजे झोल आहे की काय कळायला मार्ग नाही. ‘झो’ म्हणजे झोपडपट्टी असा अर्थ होतो. प्रत्येक झोपडपट्टीला एक आकडा असतो. त्यामुळे ‘झो’च्या जागी क्रमांक असला पाहिजे. कारण, त्या आकडय़ाप्रमाणेच एसआरएची घरे मिळतात. मग आकडय़ाप्रमाणे घरे मिळत असतील तर त्या आधारे निवडणूक आयोग मतदान ओळखपत्र का बनवत नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. काही घरांचे क्रमांक ?/??? असे आहेत. तर काहींना क्रमांकच नाहीत. असे 4,177 मतदार आहेत, ज्यांचा पत्ताच नाही. उमेदवार म्हणून त्यांच्याकडे जायचे कसे, ते राहतात कुठे, हे निवडणूक आयोगाने सांगावे, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.





























































