
मालवणी भाषेला साता समुद्रापार लोकप्रियता मिळवून देणाऱया ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकाचे लेखक व प्रख्यात नाटककार गंगाराम गवाणकर यांचे आज निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गवाणकर यांच्या निधनामुळे मराठी नाटय़सृष्टीवर शोककळा पसरली असून मालवणी भाषेचा दूत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
वयपरत्वे थकलेले गवाणकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मागच्या 15 दिवसांपासून दहिसर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच आज रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिववार मंगळवारी सकाळी बोरिवली पूर्वेकडील दौलतनगर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘वस्त्रहरण’ने काय दिले?
गवाणकर यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे साडेपाच हजार प्रयोग झाले. या नाटकाने मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा दमदार अभिनेता रंगभूमीला दिला. याच नाटकामुळे मच्छिंद्र कांबळी यांना ‘मालवणी सम्राट’ ही उपाधी मिळाली. या नाटकाने मालवणी ही ठसकेबाज भाषा साता समुद्रापार नेली.






























































